भूगाव : गिर्यारोहकांच्या विश्वात ‘स्टोक कांग्री’ शिखराला एक वेगळे महत्त्व आहे. लडाख भागातील या हिमशिखराची उंची २०,१८२ फूट आहे. खडतर चढाई आणि प्रतिकूल हवामान ही या मोहिमेतील आव्हाने आहेत. तरीही या शिखरावर पाच मराठी तरुणांनी यशस्वी चढाई केली. या मोहिमेत एकूण १५ युवकांनी सहभाग घेतला होता. मोहीम पूर्ण करण्यासाठी चार दिवसांचा कालावधी लागला.
पुण्यातील भगवान चवले, आनंद टेकवडे, संदीप भापकर, सुमीत गावडे, संभाजी गुरव, महेंद्र धावडे, धनराज पांडे, विजय बुटाला, चैतन्य तहसीलदार, सागर इंगुलकर, जयेश नहार, ऋषीकेश ढोके, डॉ. वैभव राऊत, अक्षय शेलार यांच्याबरोबर फक्त १३ वर्षांचा युगंधर चवले या १५ गिर्यारोहकांनी एव्हरेस्टवीर भगवान चवले यांच्या नेतृत्वाखाली हे शिखर सर करण्याचे ठरविले. वातावरण तसेच परिस्थितीला मात करीत, अनेक अडचणींचा सामना करीत भगवान, आनंद, संदीप, सुमीत आणि संभाजी यांनी शिखर सर केले. सोनम आणि दावा या गाईडनी त्यांना मार्गदर्शन केले. भगवान चवले यांनी यंदा एव्हरेस्ट मोहीम यशस्वीरीत्या पार केली. एक नवीन पिढी घडवण्याचा प्रयत्न करायचा, असे त्यांनी ठरविले होते; म्हणून त्यांनी लेह-लडाखमधील सर्वांत उंच शिखर स्टोक कांग्री सर करण्याचे ठरविले. सदस्यांची निवड करून एकूण १५ जणांची टीम तयार झाली. सगळ्यांची तयारी करून मोहीम फत्ते केली.