आॅनलाईन लोकमत
कोल्हापूर : पुणे व कोल्हापूरचा प्रवास आणखी लवकर व सुखकर होण्यासाठी लवकरच पुणे-कोल्हापूर इंटरसिटी एक्सप्रेस सुरू करणार अशी, घोषणा केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी शनिवारी कोल्हापुरात केली. त्याचबरोबर कोल्हापूर-वैभववाडी रेल्वेमार्गासाठी २५० कोटी मंजूर केले असून, त्याच्या पायाभरणीचे काम लवकरच सुरू करण्यात येईल, अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.
राजर्षी शाहू टर्मिनस येथे आयोजित कार्यक्रमात दुपारी पुणे-दौंड-बारामती विभागात डीईएमयू सेवेसह राज्यातील रेल्वेच्या विविध विकास प्रकल्पांच्या कामांचा प्रारंभ त्यांच्या हस्ते व्हिडिओ लिंकद्वारे करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. प्रमुख उपस्थिती महापौर हसिना फरास, खासदार धनंजय महाडिक, खासदार राजू शेट्टी, खासदार संभाजीराजे छत्रपती, खासदार प्रकाश हुक्केरी, आमदार सुधीर गाडगीळ, नीता केळकर, मध्य रेल्वेचे महाप्रबंधक डी. के. शर्मा, मध्य रेल्वेचे पुणे विभागाचे मंडल प्रबंधक बी. के. दादाभॉय, आदींची होती.
यावेळी सुरेश प्रभू म्हणाले, गेल्या काही वर्षांत भारतीय रेल्वे तोट्याच्या दुष्टचक्रात अडकली होती. त्यात उत्पन्न नसल्याने नव्या कामांसाठी पैसे नाहीत. पैसे नाहीत म्हणून विकास नाही, अशी स्थिती रेल्वेची झाली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार आल्यानंतर व माझ्याकडे रेल्वे मंत्रालय सोपविल्यानंतर आम्ही हळूहळू मार्गक्रमण करीत अनेक छोट्या शहरांना रेल्वेच्या माध्यमातून जोडले. त्यातून विकासाचे चक्र गतीने फिरू लागले. रेल्वेला दुष्टचक्रातून बाहेर काढण्यासाठी आठ हजार ५०० कोटींचा विकास कार्यक्रम जाहीर केला. ते पुढे म्हणाले, रेल्वेसाठी महाराष्ट्रालाही काही वाटा मिळावा यासाठी मी भूमिपुत्र या नात्याने प्रयत्न केला. यंदाच्या अर्थसंकल्पात तर तीन लाख ५० कोटींची तरतूद केली होती. त्यात महाराष्ट्राच्या वाट्याला सुदैवाने एक लाख ३६ कोटींचा निधी मिळाला आहे. राज्यातील कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा या ठिकाणी रेल्वे विकास प्रकल्पांची निर्णायक कामे सुरू केली जाणार आहेत.
खा. शेट्टी यांनी कोल्हापूर-वैभववाडी रेल्वेमार्ग मंजूर केल्याबद्दल सुरेश प्रभू यांचे अभिनंदन केले. महाराष्ट्रातील शेतीमाल सातासमुद्रापार जाण्यासाठी प्रगतीचे दार उघडले आहे. खा. संभाजीराजे यांनी पुणे-कोल्हापूर शताब्दी एक्सप्रेस सुरू करण्याची मागणी केली. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी नुकतेच बोलणे झाले आहे. ते आपल्याशी चर्चा करतील त्यामुळे याबाबत लवकरच निर्णय घ्यावा, असे सांगितले.
खा. महाडिक यांनी राजर्र्षी शाहू महाराजांनी २२ लाख ९९ हजार रुपये खर्च करून कोल्हापूर रेल्वे स्थानकाची उभारणी केली आहे. या रेल्वे स्थानकाची दुरवस्था झाली असून, त्यासाठी निधी मंजूर करून ते हायटेक करावे, अशी मागणी केली. कोल्हापूर-जोधपूर रेल्वे सुरू करावी, निजामुद्दीन एक्सप्रेसच्या फेऱ्या वाढवाव्यात, अशी विनंतीही त्यांनी केली.
खा. हुक्केरी यांनी पुणे-मिरज-लोंढा लाईनच्या दुहेरीकरणाबद्दल धन्यवाद देऊन हे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे, अशी विनंती केली. रेल्वेसाठी दीड लाख कोटींचा निधी उभारला रेल्वेने ‘एलआयसी’च्या माध्यमातून दीड लाख कोटींचा निधी उभा केला. त्याचबरोबर साडेतीन लाख कोटींची बाहेरील गुंतवणूकही करण्यात आली. त्याचबरोबर रेल्वेची कंपनी स्थापन करून त्या माध्यमातून आणखी प्रकल्प आणले जाणार आहेत. महाराष्ट्राला १ लाख ३६ हजार कोटी महाराष्ट्राच्या वाट्याला सुदैवाने १ लाख ३६ हजार कोटींचा निधी मिळाला आहे. तो मिळत असताना इतर राज्यांवर कुठल्याही प्रकारे अन्याय होत नसल्याचे पाहण्यात आले आहे. ही रक्कम मागील निधींपेक्षा ४०८ पट अधिक आहे. मुंबईसाठी ५० हजार कोटी; मराठवाडा, लातूर, कुर्डूवाडी, मूर्तिजापूर, उचगाव, आर्वी यासाठी २ हजार १७७ कोटी. यंदाच्या अर्थसंकल्पात पश्चिम महाराष्ट्रासाठी ७ हजार १६९ कोटीची तरतूद केली आहे.
मॅरेथॉन उद्घाटनाचा प्रत्यय
केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू शनिवारी दुपारी १ वाजून ३० मिनिटांनी हैदराबादहून कोल्हापूर विमानतळावर उतरले. त्यानंतर कोल्हापूर रेल्वेस्थानकाकडे त्यांचे प्रयाण झाले. १ वाजून ५२ मिनिटांनी ते छत्रपती शाहू टर्मिनसच्या आवारात पोहोचले. उपस्थित प्रमुख पाहुण्यांचे मनोगत २० मिनिटांत आटोपले. यात खासदार राजू शेट्टी, खासदार संभाजीराजे छत्रपती, खासदार प्रकाश हुक्केरी आणि खासदार धनंजय महाडिक यांचा समावेश होता. २ वाजून १५ वाजता रेल्वेमंत्री प्रभू यांच्या हस्ते पुणे-मिरज-लोंढा विभागादरम्यान दुपदरीकरण, विश्रामबाग-माधवनगर विभागात रस्त्यावरील पूलबांधणीचा पायाभरणी समारंभ, पुणे-दौंड-बारामती विभागांत डीईएमयू सेवेचा प्रारंभ, पुणे-दौंड विद्युतीकरण (व्हिडीओ लिंकद्वारे), पुणे स्थानकावर १६० किलोवॅट सौरऊर्जा प्रणाली, पुणे स्थानकावर वाय-फाय सुविधा, तिथे उभारण्यात आलेल्या जलशुद्धिकरण संयत्राचे उद्घाटन अशा प्रत्येकी चार कामांचा प्रारंभ व लोकार्पण सोहळा झाला. अशा प्रकारे रेल्वेमंत्र्यांनी विकासकामांचा धडाकाच केल्याने हा चर्चेचा विषय ठरला.
भकास, विकास एकत्र आल्यानंतर देशाचा फायदा
कोकणला ७६० किलोमीटरची किनारपट्टी लाभली आहे; पण तिचा विकास झालेला नाही. या उलट पश्चिम महाराष्ट्रात विकास झाला आहे. कोल्हापूर-वैभववाडी या महत्त्वपूर्ण प्रकल्पानंतर हे दोन्ही एकमेकांशी जोडून याचा फायदा कोकण किनारपट्टीसह महाराष्ट्रातील उद्योगशील माणसांना होईल. त्यामुळे राज्याचा व देशाचा फायदा होईल.
हातकणंगले-इचलकरंजी रेल्वेमार्गाचाही उल्लेख
‘महाराष्ट्राचे मॅँचेस्टर’ म्हणून गणलेल्या इचलकरंजीलाही रेल्वेमार्गाने जोडण्यासाठी गत अर्थसंकल्पात १६० कोटी रुपयांच्या निधीची गरज लागणार आहे. त्यातून हातकणंगले-इचलकरंजी असा आठ किलोमीटरचा नवा मार्ग लवकरच उदयास येणार आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात १० कोटींची तरतूद केली आहे, असा उल्लेखही प्रभू यांनी धावत्या भाषणात केला. दहा वर्षांत ४१ हजार कोटींची बचत रेल्वेचा खर्च कमी व उत्पन्नवाढीसाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. यावर्षी ४००० कोटी रुपये बचत करण्यात आली असून, वीजनिर्मितीमधील खर्च कमी करण्यात आला आहे. येत्या दहा वर्षांत ४१ हजार कोटींची बचत करण्याचा प्रयत्न राहणार आहे. यासाठी सौरऊर्जा प्रकल्पांना प्राधान्य देण्यात आले आहे, असेही प्रभू यांनी भाषणादरम्यान स्पष्ट केले. हैदराबाद येथे शनिवारी सकाळी रेल्वेच्या मालकीची विहीर पुनरुज्जीवित केली. त्यातून रेल्वेचे १० कोटी रुपये वाचणार आहेत. अशा प्रकारे नैसर्गिक स्रोतांच्या वापराने नफ्यात वाढ करण्याचा प्रयत्न करू, असेही प्रभू यांनी स्पष्ट केले.
चित्रकार प्रशांत जाधव यांनी कोल्हापूरच्या संस्थानकालीन रेल्वेस्थानकाचे चित्र जलरंगात रेखाटले होते. ते चित्रकार विजय टिपुगडे, सागर बगाडे व स्वत: जाधव यांनी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांना दिले. प्रभू यांनी चित्राचा स्वीकार व कौतुक करीत ते आपल्या कार्यालयात लावण्याची तयारी दर्शविली.