पुणे, दि. 6 - बाबू गेनू, श्रीमंत भाऊ रंगारी आणि अखिल मंडई मंडळांच्या दिमाखदार मिरवणुकांनंतर पहाटे 2 वाजून 43 मिनिटांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाच्या वैभवशाली मिरवणुकीला सुरुवात झाली आणि सकाळी 7 वाजेच्या सुमारास बाप्पाचं विसर्जन करण्यात आलं. पहाटे 2 वाजुन 40 मिनिटांनी दगडूशेठ गणपतीचे बेलबाग चौकात थाटात आगमन झाले आणि 2 वाजून 43 मिनिटांनी बाप्पाच्या मिरवणुकीला सुरूवात झाली. लाडक्या गणरायाचं अखेरचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. दगडूशेठ गणपती दृष्टीपथात येताच भाविक जल्लोष करत होते. प्रभात बॅंड, दरबार बॅंड, स्वरूप वर्धिनीचे ढोलताशा आणि ध्वज पथकाच्या तालात गणराय विसर्जन मार्गावर आले. पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्या हस्ते बेलबाग चौकात गणपतीची आरती करण्यात आली. त्यानंतर शुक्ला यांनी स्वतः धुम्रवर्ण रथाचे सारथ्य केले. एकूणच वातावरण भक्तिमय आणि चैतन्यदायी असे होते. जय गणेशच्या जयघोषाने आसमंत व्यापून गेला होता.
मिरवणुकीसाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त, गर्दीवर राहणार सीसीटीव्हीची नजर-
गणेश विसर्जन मिरवणूक शांततेत व सुरक्षित पार पाडण्यासाठी पोलीस विभाग सज्ज होता. साडेआठ हजार पोलिसांचा फौजफाटा बंदोबस्तासाठी रात्रंदिवस तैनात होता. मिरवणुकीत होणा-या प्रत्येक बारीक हालचालींवर पोलिसांसह सीसीटीव्हीच्याही ‘तिस-या डोळ्याची’ नजर होती. प्रत्येक मंडळात तीन वाद्यपथकांची मर्यादा ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. पोलीस सहआयुक्त रवींद्र कदम यांनी याबाबत माहिती दिली. बंदोबस्तात पोलीस आयुक्त, सहआयुक्त, चार अतिरिक्त पोलीस आयुक्त, १६ उपायुक्त, ३३ सहायक आयुक्त, २०४ पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक आणि ७ हजार ८७० पोलीस शिपायांचा फौजफाटा बंदोबस्तासाठी तैनात होता. गृहरक्षक दलाचे जवान, राज्य राखीव पोलीस दल बंदोबस्तासाठी पोलिसांना मदत केली. बंदोबस्तासाठी पुण्याच्या बाहेरून ५ उपायुक्त, १२ सहायक आयुक्त, ६५ पोलीस निरीक्षक, ३० उपनिरीक्षक व सहायक निरीक्षक, २२० होमगार्ड व ३ राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकड्या बंदोबस्तासाठी होत्या. विसर्जन मिरवणुकीतील चोरीचे वाढते प्रकार पाहता मिरवणुकीत साध्या वेशातील पोलिसांचे पथक गस्त घालत होते. छेडछाडीचे प्रकार रोखण्यासाठी महिला पोलिसांचे आणि गुन्हे शाखेचे पथक होते. प्रत्येक मंडळाला त्यांच्यासमोर तीन वाद्यपथके लावण्याच्या सूचना करण्यात आल्या. प्रत्येक पथकामध्ये २५ ढोल व ५ ताशांची मर्यादा घालून देण्यात आली. डीजेच्या भिंती लावणा-या मंंडळांवर कारवाई करण्यात आली. मिरवणूक मार्गावरील आवाज मोजण्यात येणार असून, आवाजाची मर्यादा ओलांडणाºयांवरही कारवाई करण्यात येणार आहे. तसेच, वाहतूक शाखेकडून स्वतंत्र बंदोबस्त देण्यात आला होता. यामध्ये १ उपायुक्त, ४ सहायक आयुक्त, १०४ अधिकारी व १३९६ पोलिसांचा बंदोबस्तामध्ये होते. वाहतूक पोलिसांना पाचशे स्वयंसेवक बंदोबस्तामध्ये मदत केली.महापालिकेची व्यवस्था : सर्व घाटांवर बसवले आहेत कॅमेरे-विसर्जनासाठी घाटांवर येणा-या गर्दीवर नजर ठेवण्यासाठी महापालिकेने सीसीटीव्ही कॅमेरे बसविले होते. शहरातील १७ घाटांवर एकूण ५७ ठिकाणी महापालिकेने विसर्जनाची व्यवस्था केली होती. या सर्व ठिकाणच्या गर्दीवर सीसीटीव्हीची नजर होती. महापालिकेची कर्मचारी तसेच पोलीसही या कॅमे-यांचे मॉनिटरिंग करण्यात आली.