मांडवगण फराटा (पुणे) : इनामगाव (ता. शिरूर) येथील दर्यापट परिसरात शनिवारी (ता.८) रात्री ११:३० वाजेच्या सुमारास बिबट्याने केलेल्या हल्ल्यात शेतमजुराचा बारा वर्षांचा मुलगा गंभीर जखमी झाला. अंकुश सुदाम ठाकरे (वय १२ ), असे त्याचे नाव आहे. बिबट्या मुलाला घेऊन जात असलेले पाहून मुलाच्या आईने केलेल्या आराडाओरड्याने बिबट्या निघून गेला. त्यामुळे मुलाचा जीव वाचला.
इनामगाव येथे गेल्या तीन महिन्यांपासून आबासाहेब भगवान कुरूमकर या शेतकऱ्याच्या शेतामध्ये ठाकरे कुटुंब शेतातील कामानिमित्त राहत आहे. शनिवारी (दि.८) रात्री ११ वाजेच्या सुमारास या परिसरात जोरदार पावसाने हजेरी लावली. यावेळी ठाकरे कुटुंब राहत असलेल्या घरात पावसाचे पाणी शिरले. त्यामुळे घराशेजारील कुरूमकर यांच्या पोल्ट्री शेडमध्ये ठाकरे कुटुंबीय झोपण्यासाठी गेले. यावेळी गाढ झोपेत असताना शेजारच्या उसाच्या शेतातून आलेल्या बिबट्याने पोल्ट्री शेडमध्ये प्रवेश केला.
पोल्ट्री शेडमध्ये उजव्या बाजूला झोपलेल्या अंकुश ठाकरे याच्या हाताला धरून बिबट्याने त्याला ५० फूट फरफटत नेले. यावेळी अचानक झालेल्या हल्ल्याने अंकुश ठाकरे याचा ओरडल्याचा आवाज आला. मुलाचा ओरडल्याचा आवाज आल्याने आई मंजू ही जागी झाली व तिने जोरात आरडाओरडा सुरू केला. मोठ्या प्रमाणात आरडाओरडा झाल्याने मुलाचे वडील व अन्य कुटुंबीय जागे झाले. ते पाहून बिबट्याने चिमुकल्याला सोडून तेथून पळ काढला. याबाबत शरद घाडगे यांनी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना माहिती दिली.
वन विभागाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. वनमजूर नवनाथ गांधले यांनी जखमी मुलाला तत्काळ शिरूर येथील सरकारी दवाखान्यात दाखल केले. या धक्कादायक घटनेने परिसरामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे वन विभागाने तत्परतेने शोध घेऊन बिबट्याचा बंदोबस्त करावा व सदर लहान मुलास योग्य ती मदत द्यावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांमधून केली जात आहे.
‘डोळ्यांदेखत बिबट्या मुलाला ओढत घेऊन जात होता. अक्षरशः यावेळी अंगावर काटा आला होता. मी आरडाओरडा केला नसता, तर माझ्या मुलाचा जीव गेला असता. आम्ही पोट भरण्यासाठी कामानिमित्त इकडे आलो आहोत. शासनाने आम्हाला मदत करावी, अशी आमची मागणी आहे.’
- मंजू सुदाम ठाकरे मुलाची आई
‘बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या लहान मुलावर योग्य ते उपचार करण्यात येतील. इनामगाव परिसरात वन विभागाकडून रात्र गस्त, तसेच जनजागृती केली जाईल. नागरिकांनी रात्रीच्या वेळी प्रवास करताना योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे.’
-प्रताप जगताप, वनपरिक्षेत्र अधिकारी, शिरूर वन विभाग