पुणे : पुणे शहर आणि परिसरात सातत्याने कोरोनाबाधित रुग्णांमध्ये वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार व अधिकार्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत पुणे शहरासह पिंपरी-चिंचवडमध्येही पुन्हा लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला. सोमवारपासून दोन्ही शहरांमध्ये कडक लॉकडाऊन असणार आहे. त्यामुळे नागरिकांनी कर्वेनगर, कोथरुड , कात्रज, मंडई, सिंहगड रस्ता आदी ठिकाणी जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी शनिवारी सकाळपासून एकच झुंंबड उडाली. यादरम्यान सोशल डिस्टनसिंगचे तीन तेरा वाजल्याचे पाहायला मिळाले.
पुणे शहर व पिंपरी चिंचवडमध्ये १३ जुुलै ते २३ जुुलै पुन्हा एकदा लॉकडाऊनची घोषणा विभागीय आयुुुक्त डॉ. दीपक म्हैसेकर याांनी केली आहे. या काळात फक्त अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी शुक्रवारी सायंकाळपासूनच दुकानांसमोर गर्दी करण्यास सुरूवात केली आहेे. दारूच्या दुकानांबाहेर तळीरामांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे पाहायला मिळाले. तर शनिवारी सकाळी सात वाजल्यापासून आंबेगाव बुद्रुक येथील डि मार्ट मध्ये जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी ग्राहकांची तुडुंब गर्दी पाहवयास मिळाली. डि मार्टच्या बाहेर जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी ग्राहकांच्या रांगा लागल्या होत्या. सार्वजनिक जागेत गर्दी होऊन कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून प्रशासनाने लावलेल्या प्रतिबंधक कायद्यालाच यामुळे हरताळ फासला जात असल्याचे चित्र डि मार्ट समोर दिसून आले.
प्रशासनाने जाहीर केलेल्या लॉकडाऊनच्या आधी तयारीसाठी ३ दिवसांचा अवधी दिला आहे. कात्रज देहूरोड बाह्य वळण महामार्ग भागांतील डी-मार्टमध्ये गर्दी झाल्याचे आढळून आले. डी-मार्टमध्ये होत असलेल्या गर्दीमुळे सरकारने सार्वजनिक जागांवर गर्दी टाळण्यासाठी लागू केलेल्या प्रतिबंधात्मक कायद्यालाच हरताळ फासला जात आहे. या ठिकाणी होत असलेल्या हजारो नागरिकांच्या गर्दीत कोरोना व्हायरस अधिक फोफावण्याची दाट शक्यता असल्यामुळे महापालिकेतर्फे सोशल डिस्टस्निंग व गर्दी नियंत्रित करण्याच्या सुचना द्याव्यात, त्याबरोबर गर्दी कमी करण्यासाठी नागरिकांनी नियमांचे पालन करावेे.