Pune Lockdown 2.0: लॉकडाऊनच्या धास्तीने पुण्यातील मार्केटयार्डमध्ये पहाटेपासूनच उसळली गर्दी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2020 10:26 AM2020-07-12T10:26:16+5:302020-07-12T10:29:10+5:30
नागरिकांकडून सोशल डिस्टनसिंग, सॅनिटायझर, मास्क वापर यांसारख्या सर्व नियमांचे सर्रास उल्लंघन करण्यात आले.
पुणे : पुणे शहरातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. त्याच पार्श्वभूमीवर पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पुणे व पिंपरी- चिंचवड शहरात १३ ते 23 जुलै असा दहा दिवसांचा कडक लॉकडाऊन जाहीर करण्याचा निर्णय घेतला. मात्र या लॉकडाऊनचा चांगलाच धसका नागरिकांनी घेतली असून त्याचा प्रत्यय रविवारी पहाटेपासून मार्केटयार्ड परिसरात पाहायला मिळत आहे. त्याठिकाणी नागरिकांनी भाजीपाल्यासह इतर जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी प्रचंड गर्दी केल्याचे चित्र दिसत होते.
लाॅकडाऊनच्या धास्तीने रविवारी पहाटे 3 वाजल्या पासूनच मार्केट यार्डात किरकोळ विक्रेत्यासह पुणेकरांनी देखील प्रचंड गर्दी केली.गर्दी एवढी प्रचंड प्रमाणात होती की बाजार समिती प्रशासन व पोलिसांना देखील नियंत्रण करणे शक्य झाले नाही. सर्वसामान्य नागरिकांना बाजार आवारात बंदी असताना एकाच वेळी झालेल्या गर्दीमुळे प्रशासन हतबल झाले व नागरिकांनी जबरदस्तीने गेट उघडून बाजार आवारात प्रवेश केला. यादरम्यान एकाचवेळी हजारो लोकांनी बाजार आवारात प्रवेश केल्याने एकच गोंधळ उडाला. कोरोनाची भिंती, सुरक्षित सामाजिक अंतर, मास्क सर्व नियम धाब्यावर बसवले गेले.