पुणे : कोरोनाची वाढती संख्या लक्षात घेऊन कोरोनाबाधितांच्या संसर्गाची साखळी तोडण्यासाठी, पुणे शहरात मंगळवारी (दि.१४ ) रात्री १ वाजल्यापासून २३ जुलैच्या मध्यरात्री १२ पर्यंत शहरात कडकडीत ‘लॉकडाऊन’ जाहीर केला आहे. यामुळे नागरिकांना घराबाहेरही पडता येणार नाही.या काळात दूध विक्रीसाठीही मर्यादित वेळ देण्यात आली असून, अत्यावश्यक बाब म्हणून केवळ औषधे विक्री (मेडिकल) व दवाखाने यांनाच परवानगी देण्यात आली आहे. दरम्यान, या काळात वर्तमानपत्रे सुरू राहणार असून, वर्तमानपत्रे वितरित करण्यासाठी सकाळी ६ ते ९ वाजेपर्यंत वेळ देण्यात आली आहे. महापालिकेचे नवनियुक्त आयुक्त विक्रम कुमार यांनी याबाबतचे आदेश रविवारी रात्री जारी केले आहेत.
या नव्या लॉकडाऊनमध्ये पहिल्या पाच दिवसात म्हणजे १८ जुलैपर्यंत कडकडीत ‘लॉकडाऊन’ पाळला जाण्याच्या सूचना करण्यात आल्या आहे. या काळात केवळ दूध व्रिकी, दुधाचे घरपोच वितरण, वर्तमानपत्रे वितरण व्यवस्था, अत्यावश्यक सेवांसाठी सकाळी ९ ते दुपारी २ पर्यंत पेट्रोल पंप व गॅस पंप सुरू राहणार आहेत. तसेच पहिल्या पाच दिवसात भाजीपाला व किराणामालाची दुकाने ही पूर्णत: बंद राहणार आहेत.
पुणे महापालिका क्षेत्रातील ६५ वर्षावरील सर्व व्यक्ति, अति जोखमीचे आजार (मधुमेह, उच्च रक्तदाब, दमा, यकृत व मुत्रपिंडाचे आजार, कर्करोग, ऌकश् बाधित रुग्ण इ.) असलेल्या व्यक्ती, गरोदर महिला, वय वर्षे १० पेक्षा कमी वयोगटातील मुले यांना अत्यावश्यक सेवा व वैद्यकीय कारणाशिवाय घराबाहेर जाता येणार नाही. तसेच इतर कोणत्याही व्यक्तिस अत्यावश्यक वैद्यकीय कारणाशिवाय घराबाहेर पडता येणार नाही.
या शिवाय इतर कोणतीही व्यक्ती पायी अथवा सायकलवर अथवा चारचाकी तथा दोनचाकी वाहन घेऊन घराबाहेर विनाकारण फिरत असल्यास त्याचे चारचाकी / दुचाकी वाहन जप्त करण्यात येणार आहे. तसेच त्यांचा वाहन परवाना रद्द करण्यात येणार असून, त्यांच्यावर साथरोग नियंत्रण कायद्यातील तरतूदीनुसार व तत्सम इतर कायद्यातील तरतुदीनुसार गुन्हा नोंद करण्यात येणार आहे.