पुणे : राज्यात आंतरजिल्हा प्रवासावर बंधने आणण्यानंतर गेल्या १७ दिवसांमध्ये १ लाख ५ हजार ७४४ पुणेकरांनी ई पास मिळविण्यासाठी पुणे पोलीस आयुक्तालयात अर्ज केले. त्यापैकी २७ हजार ५९२ जणांचे ई पास मंजूर करण्यात आले आहे. तब्बल ५७ हजार ९९ जणांचे अर्ज फेटाळण्यात आले आहेत.
कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे राज्य शासनाने २३ एप्रिलपासून राज्यात जिल्हाअंतर्गत प्रवासाला बंदी घातली. अत्यावश्यक कारणासाठी प्रवास करायचा असेल तर ई -पास बंधनकारक करण्यात आले आहे. यावेळी ई पाससाठी कोविड चाचणी केलेल्या प्रमाणपत्र जोडण्यास अत्यावश्यक केले आहे. तसेच केवळ जवळच्या नातेवाईकांचे निधन अथवा वैद्यकीय सुविधा अशा कारणांसाठी ई पास दिला जात आहे. त्यामुळे अन्य कारणासाठी कोणी अर्ज केला असेल. तसेच कोविड प्रमाणपत्र जोडले नसेल, तर ई पास मंजूर केला जात नाही. त्यामुळे ई पास नाकारले जात असल्याचे गुन्हे शाखेचे उपायुक्त श्रीनिवास घाडगे यांनी सांगितले.
असा करा ई- पाससाठी अर्जपोलिसांनी एक वेबसाईटचा पत्ता दिला आहे. त्यावरील अर्ज भरावा़ त्यात प्रामुख्याने प्रवासाचे कारण काय, कधी, कोठे, कोणत्या गाडीने जाणार याची आवश्यक ती माहिती भरावी. तसेच त्यासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे उदा. कोविड चाचणीचा निगेटिव्ह रिपोर्ट, आधारकार्ड व ज्या कारणासाठी प्रवास करायचा आहे. त्याची पुष्टी देणारी कागदपत्रे जोडावीत.
जिल्ह्याबाहेर जायचे असेल तर त्यासाठी तुमच्याकडे ई पास आवश्यक आहे. जिल्ह्याच्या शहराच्या सीमेवर तुम्हाला अडविल्यास व तेथे तुमच्याकडे ई पास नसल्यास तेथून तुम्हाला परत माघारी पाठविले जाऊ शकते.
२४ तासांत मिळतो तुम्हाला ई- पासप्रवासासाठी नागरिकांकडून ऑनलाईन अर्ज आल्यानंतर त्यावर प्रक्रिया करण्यासाठी सेवा प्रकल्पात २४ तास कर्मचार्याची नियुक्ती करण्यात आली आहे. अर्ज आल्यावर तेथील कर्मचारी अर्जाचे कारण पाहतात. त्यासाठी आवश्यक ती कागदपत्रे जोडलेली आहेत का. ज्यांनी अर्ज केला, त्यांचेच आधारकार्ड आहे का. कोविड चाचणीचे निगेटिव्ह रिपोर्ट सोबत जोडला आहे का, याची तपासणी करतात. कारण योग्य वाटल्यास अर्ज मंजूर केला जातो. हे काम काही मिनिटांमध्ये पूर्ण होते. मात्र अनेकदा अर्जांची संख्या खूप असते. त्यामुळे प्रलंबित अर्जांची संख्या अधिक असेल तर साधारण २४ तासात अर्जावर निर्णय होतो.