पुणे : राज्यातील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी बुधवारी रात्री 8 वाजल्यापासून राज्यात कडक लाॅकडाऊन लागू करण्याची घोषणा केली. या घोषणेमुळे मात्र बुधवारी सकाळ पासूनच शहराच्या विविध भागात लोकांनी फळभाज्या, पालेभाज्या खरेदीसाठी मोठ्याप्रमाणात गर्दी केली. लोकांच्या भीतीचा गैरफायदा घेत किरकोळ विक्रेत्यांनी दरामध्ये तब्बल 20-30 टक्क्यांनी वाढ केली.
गेल्या काही दिवसांत राज्यात कोरोनाचा उद्रेक झाला असून, पहिल्या लाटेपेक्षा दुस-या लाटेत कोरोना रुग्णांची संख्या वाढण्याचे प्रमाण खूपच जास्त आहे. यामुळेच सध्या राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता आरोग्य यंत्रणा अपुरी पडत असून, रुग्णांना रेमडेसिविर औषधासह व्हेंटिलेटर बेड व ऑक्सिजन बेड देखील उपलब्ध होत नाहीत. या गंभीर परिस्थितीचा अंदाज घेऊन राज्यातील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी शासनाने एप्रिल अखेर पर्यंत कडक लाॅकडाऊन जाहीर केला आहे.
शासनाने लाॅकडाऊन जाहीर केला असला तरी अत्यावश्यक सेवा म्हणजे भाजीपाला, किराणा दुकानासह , दुध विक्री सुरूच राहणार आहे. परंतु भाजीपाला खरेदी करण्यासाठी देखील बाहेर पडता येईल का या धास्तीने बुधवारी सकाळ पासूनच लोकांनी फळभाज्या, पालेभाज्या खरेदी करण्यासाठी गर्दी केली. मार्केट यार्डात बुधवारी नियमित पेक्षा थोडी अधिक आवक होऊन देखील मागणी वाढल्याने घाऊकमध्ये देखील थोडी दर वाढ झाली, परंतु किरकोळ विक्रेत्यांनी लोकांच्या भितीचा फायदा घेत फळभाज्यांमध्ये मोठी दर वाढ केली. पंधरा रुपयांची कोथींबीर गड्डी 25 ते 30 रुपये, तर अन्य फळभाज्यांमध्ये देखील 20-30 टक्क्यांनी दर वाढ केली. -------भाजीपाला घाऊक दर किरकोळ दर कांदा 08-12 25-30बटाटा 08-14 30-35टोमॅटो 8-12 40-45भेंडी 25-30 45-50गवार 35-40 60-65मिरची 35-55 60-70कोथींबीर 10-12 25-30मेथी 07-19 20-25 मटार 55-60 80-90