Pune Lockdown : पुण्यात अनलॉक? पालकमंत्री अजित पवारांनी दिले संकेत; सोमवारी होणार निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2021 08:59 PM2021-06-04T20:59:20+5:302021-06-04T21:11:05+5:30
तसेच पुणे ग्रामीणमध्ये सूट दिली जाणार नसल्याचेही अजित पवारांनी स्पष्ट केले.
पुणे : लॉकडाऊनच्या बाबतीत शिथिलता देण्याचा निर्णय ज्या भागात पॉझिटिव्हीटी रेट ५ टक्क्यांच्या आत आहे त्यासाठी असणार आहे. काल समज- गैरसमज झाले. थोड्या वेगळ्या बातम्या आल्या. पण उद्धव ठाकरे यांचाच निर्णय अंतिम राहणार आहे. तसेच पुणे शहरात पॉझिटिव्हीटी रेट ५ पर्यंत आला आहे. त्यामुळे सोमवारपासून पुणे, पिंपरी चिंचवडबाबत वेगळे धोरण अवलंबिले जाणार आहे, असे मत राज्याचे उपमुख्यमंत्री व पुुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले. त्यामुळे पुण्यात अनलॉकची प्रक्रिया लवकरच सुरू होणार असल्याची शक्यता आहे.
पुण्यात अजित पवार यांच्या उपस्थितीत कोरोना आढावा बैठक झाली. या बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. या बैठकीला लोकप्रतिनिधी यांच्यासह वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
पवार म्हणाले. पुणे ग्रामीणमध्ये सूट दिली जाणार नाही कारण नाही तिथे पॅाझिटिव्हिटी रेट अद्यापही जास्त आहे. गाईडलाईनप्रमाणे काम सुरु आहे. हेे सातत्य टिकले पाहिजे, यात कुचराई होउ नये. पुण्यात ब्लॅक फंगससाठी मोठी बिलं येत होती. सरकारी हॅास्पिटलमध्ये बिलं काय लावायची याचे आदेश काढलेले आहेत. खासगी रुग्णालय वाल्यांनी २० -२२ लाख बिलं लावली आहेत. मात्र, याबाबत मुख्यमंत्र्यांनी काढलेले आदेश स्पष्ट दिले आहेत. तिन्ही प्रकारच्या बेडची उपलब्धता सगळीकडे आहे.
पुढे पवार म्हणाले, ब्लॅक फंगसच्या औषधाची अजून कमतरता आहे. पुण्याला खडकी आणि पुणे कॅन्टॅानमेंट पुणे शहरात धरले जात नाहीत. पुणे शहराची नियमावली या कॅन्टॅानॅमेंटला लावावी लागणार आहे. देहुला १०% पॅाझिटिव्हीटी त्यामुळे तिथे दिलासा नाही. रोजची आकडेवारी पाहून सोमवारी निर्णय घेतला जाणार आहे.
वारकऱ्यांना समजवायचा प्रयत्न केला. त्यांनी समितीची मागणी केली. सौरभ राव आणि लोहिया यांच्या उपस्थितीमध्ये समिती नेमली आहे. वारकऱ्यांची मागणी वेगळा विचार करा. ते तीन चार दिवसांत रिपोर्ट देतील. वारकरी म्हणतात ५० लोक जाणार पण पालखी पुढे जाईल तसे लोक दर्शनाला येतील. समितीचा रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना दाखवणार ते अंतिम निर्णय घेतील, असेही अजित पवार यांनी यावेळी स्पष्ट केले.