पुणे : पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचे आज पुण्यात निधन झाले. त्यांचे पार्थिव दुपारी २ ते ६ पर्यंत शनिवार पेठेतील निवासस्थानी अंतदर्शनासाठी ठेवण्यात येईल. संध्याकाळी सात वाजता वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. बापट यांंनी शेवटपर्यंत पक्षासाठी काम केले. पुणे शहरात भाजप पक्ष वाढण्यासाठी त्यांनी मोलाचे योगदान दिले. ज्या-ज्या वेळी पक्षाने त्यांना हाक दिली त्यावेळी स्वतःच्या तब्येतीचा विचार न करता पक्षाला मदतीसाठी ते आले. विधानपरिषद निवडणूक मतदान असो किंवा कसबा विधानसभा निवडणूक, प्रत्येकवेळी त्यांनी पक्षाच्या हिताचा विचार करून काम केले.
चार दशकांच्या राजकीय कारकीर्दीत गिरीश बापट यांनी संघ स्वयंसेवक, कामगार नेता, नगरसेवक, आमदार आणि खासदार, राज्याच्या मंत्रिमंडळात अनेक खात्यांचे मंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अशा विविध पदावर काम केले. पुणे शहरातील राजकारणात बापट यांची चांगली पकड होती. ते शहरातील मध्यवर्ती विधानसभा मतदारसंघ असणाऱ्या कसबा मतदारसंघातून सलग पाच वेळा आमदार म्हणून निवडून आले होते.
पक्षासोबतची एकनिष्ठता शेवटपर्यंत जपली-
मविआचे सरकार पडल्यानंतर भाजप पक्षासाठी कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभेची पोटनिवडणूक प्रतिष्ठेची बनली होती. यासाठी भाजपकडून सर्व ताकद पणाला लावण्यात आली. कसबा पेठ निवडणुकीवेळी खासदार गिरीश बापट स्वतः भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी रिंगणात उतरले होते. गिरीश बापट हे व्हीलचेअरवर केसरी वाडा येथे कसब्याचे भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांचा प्रचार करण्यासाठी आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित राहिले होते. प्रकृती अस्वस्थ असताना देखील गिरीश बापट यांनी पक्षाशी एकनिष्ठ राहत आणि पक्षाप्रती आपले कर्तव्य बजावण्यासाठी पोटनिवडणुकीच्या प्रचाराला हजेरी लावली होती. यावेळी ते व्हीलचेअरवर आले होते. नाकात ऑक्सिजनची नळी, व्हीलचेअरला ऑक्सिजन सिलेंडर लावून ते केसरी वाडा येथे आले होते. त्यापूर्वी विधान परिषद निवडणुकीसाठी त्यांनी रुग्णवाहिकेमधून जाऊन मतदान केले होते.
'हे' होते यशस्वी राजकीय कारकीर्दीचे रहस्य
गुढीपाडव्यानिमित्त कसबा गणपतीसमोर गिरीश बापटांच्या खासदार निधीतून करण्यात आलेल्या विकास कामांच्या उद्घाटनाला गिरीश बापट यांच्याकडून कसब्याचे काँग्रेसचे विद्यमान आमदार रविंद्र धंगेकर आणि त्यांचे भाजपमधील प्रतिद्वंद्वी हेमंत रासने यांना आमंत्रित करण्यात आले होते. हा सर्वसमावेशकपणा हेच गिरीश बापट यांच्या राजकारणाचे वैशिष्ट्य होते आणि चाळीस वर्षांच्या यशस्वी राजकीय कारकीर्दीचे रहस्य होते.