पुणे : पुणेशिरूरमावळ या तिन्ही लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत मतदानाच्या दोन तासांच्या तिसऱ्या टप्प्यात सर्वाधिक मतदान मावळमध्ये २७.१४ टक्के इतके झाले आहे. पुण्यात २६.४८ तर सर्वात कमी मतदान शिरूर लोकसभा मतदारसंघात २०.८९ टक्के इतके झाले आहे. विधानसभा मतदारसंघनिहाय विचार केल्यास शहरी भागात अजुनही मतदारांच्या रांगा दिसत असून ग्रामीण लोकसंख्या असलेल्या विधानसभा मतदारसंघात मतदानाचा जोर ओसरला आहे.
मतदानाच्या तिसऱ्या टप्प्यात अर्थात अकरा ते एक या वेळेत शहरी भागात अनेक मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा दिसून आल्या आहेत. पुणे लोकसभा मतदारसंघात आतापर्यंत २६.४८ टक्के मतदान झाले आहे. तर, शिरूर लोकसभा मतदारसंघात २०.८९ व मावळ लोकसभा मतदारसंघात २७.१४ टक्के मतदान झाले आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघातील भोसरी, हडपसर व खेड आळंदी या शहरी मतदारसंघात अनेक मतदान केंद्रांवर रांगा असल्याने या टप्प्यात किमान दहा ते बारा टक्के मतदान झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. तर, मावळ लोकसभा मतदारसंघातील बहुतांश भाग शहरी असल्याने या ठिकाणी मतदानाची आकडेवारीदेखील वाढली आहे
पुणे लोकसभा मतदारसंघात सकाळी सात ते दुपारी एकपर्यंत सर्वाधिक मतदान कसबा पेठ येथे ३१.१० टक्के इतके झाले असून त्याखालोखाल कोथरूड विधानसभा मतदारसंघात २९.१० टक्के मतदान झाले आहे. पर्वती विधानसभा मतदारसंघात २७.१४, पुणे कॅन्टोन्मेंट २३.२१, शिवाजीनगर २३.२६, वडगाव शेरी २४.८५ टक्के मतदान झाले आहे.
मतदार यादीत नावे नसल्याने अनेकांचा हिरमोड होत असून आता काही मतदारांच्या नावावर यापूर्वीच मतदान झाल्याचे ही उघड झाले आहे. त्यात पुणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या नावावर बनावट मतदान झाल्याचे स्पष्ट झाले असून एकाच्या नावावर दुसऱ्यानेच मतदान केल्याच्या तक्रारी देखील वाढत आहेत.