कसब्याचा करिष्मा कसब्यातच फसला! धंगेकरांची उमेदवारी स्थानिक नेत्यांना आवडली नाही का?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2024 03:06 PM2024-06-06T15:06:29+5:302024-06-06T15:06:59+5:30

रवींद्र धंगेकर हे उमेदवार म्हणून काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांना पसंतच नसल्याने प्रचारात नेत्यांची एकी काही दिसली नाही

pune loksabha congress candidate ravindra dhangekar voting decreases in kasba peth | कसब्याचा करिष्मा कसब्यातच फसला! धंगेकरांची उमेदवारी स्थानिक नेत्यांना आवडली नाही का?

कसब्याचा करिष्मा कसब्यातच फसला! धंगेकरांची उमेदवारी स्थानिक नेत्यांना आवडली नाही का?

पुणे: कसबा विधानसभेची साधारण वर्षभरापूर्वीच झालेली पोटनिवडणूक. हा मतदारसंघ गिरीश बापट यांचा. सलग ५ वेळा त्यांनी जिंकला. त्यांच्याआधीही भाजपच्या व त्याही आधी जनसंघाच्या ताब्यात तो होता. सलग २८ वर्षे त्यावर भाजपचा झेंडा होता. कसब्याच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसने महाविकास आघाडीच्या माध्यमातून तो काढून टाकला.

काँग्रेससह सर्व मित्र पक्षांनी जीव तोडून काम केले. भाजपसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुक्कामी राहिले. देवेंद्र फडणवीस एक-दोन वेळा नव्हे, तर तब्बल ११ वेळा येऊन गेले. केंद्रीय मंत्री आले, राज्यातील कितीतरी मंत्री आले. त्या तुलनेत काँग्रेसने फक्त एकी दाखवली. अशी एकी, की निकालाच्याही आधी दोन दिवस भाजपला कळून चुकले होते की, काहीतरी गडबड झाली. त्यातून ते सावरलेच नाही. निकाल लागला, त्यावेळी काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर यांनी तब्बल ११ हजार मतांनी बाजी मारली होती. हाच करिष्मा पुन्हा एकदा चालवायचा म्हणून काँग्रेसने त्याच धंगेकर यांना पुणे शहर लोकसभेची उमेदवारी दिली. पण, हा करिष्मा चाललाच नाही. धंगेकर यांना ते स्वत: आमदार असलेल्या या मतदारसंघातून १४ हजार ४८३ मतांची पिछाडी मिळाली. कसब्यातील त्यांचा करिष्मा गायब झाल्याचे हे चिन्ह आहे.

करिष्मा फसण्याची कारणे

याची कारणे अनेक, पण एक कारण महत्त्वाचे. त्यावेळची एकी काही यावेळच्या प्रचारात दिसली नाही. धंगेकर हे उमेदवार म्हणून काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांना पसंतच नव्हते. माजी उपमहापौर असलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आबा बागूल यांनी तर जाहीरपणे काँग्रेस भवनमध्ये उपोषण केले. आणखी एका पदाधिकाऱ्याने मित्र पक्षांच्या भल्या मोठ्या बैठकीतून आपल्याच पक्षाच्या काही पदाधिकाऱ्यांवर जाहीर टीका करत बैठकीचा त्याग केला होता. आणखी एक पदाधिकारी दिसत सगळीकडे होते, मात्र काम काहीच करत नव्हते. काहीजण काँग्रेसभवन सोडून कुठेच जात नव्हते.

मित्र पक्षांकडे दुर्लक्ष 

ज्यांच्याकडे समन्वयाची जबाबदारी होती त्यांनी आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार), शिवसेना (उद्धव ठाकरे) या प्रमुख मित्रपक्षांसह एकाही पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना कधी विश्वासात घेतले नाही. त्यांना कुठल्या समितीत स्थान दिले नाही. जणू काँग्रेस म्हणजे एक ताकद आहे व बाकीचे सगळे त्यामुळेच बरोबर आले आहेत. याचा परिणाम म्हणूनच घरच्या मतदारसंघात पिछाडीवर राहण्याची नामुष्की काँग्रेसवर आली.

विधानसभेचे गणित 

भाजपला मात्र इथून मिळालेल्या आघाडीने दिलासा मिळाला असेल. कारण, कसब्यातील मतदार अजूनही आपलाच आहे, दूर गेलेला नाही, याची खात्री त्यांना पटली आहे. पोटनिवडणुकीत केलेल्या चुका आता दोन महिन्यांनी येणाऱ्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत ते करणार नाहीत. मतदारांना विश्वासात घेतील. स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या संमतीनेच निर्णय घेतील. दुसरीकडे काँग्रेसला मात्र कसब्याचा जिंकलेला गड राखायचा कसा? याची चिंता खात राहील. विधानसभेसाठी १४ हजार मते कमी नाहीत. त्यामुळे त्यांनाही विचार करावाच लागेल, असे दिसते.

कसबा विधानसभा मतदारसंघात लोकसभेसाठी झालेले मतदान

मुरलीधर मोहोळ - ८७,५६५
रवींद्र धंगेकर - ७३,०८२
मताधिक्य - १४,४८३

Web Title: pune loksabha congress candidate ravindra dhangekar voting decreases in kasba peth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.