- राजू इनामदार
पुणे : कुस्ती हरण्याची शक्यता वर्तवली जात असल्याने आखाडाच रद्द करण्याचा विचार सुरू आहे, असे समजते. पुणे लोकसभेची जागा रिक्त झाल्यानंतर दोन महिने झाले तरी आयोगाकडून पोटनिवडणूक जाहीर होत नसल्याने आता नियमित म्हणजे सन २०२४ मध्ये निवडणूक होईल, असे बोलले जात आहे. त्यामुळेच आखाडा रद्द होण्याची चिन्हे असल्याची चर्चा जोर धरत आहे.
कसबा विधानसभेच्या दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांचे २२ डिसेंबरला निधन झाले. त्यानंतर निवडणूक आयोगाने लगेचच महिनाभरात म्हणजे १९ जानेवारीला या मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार २७ फेब्रुवारीला निवडणूक झाली, २ मार्चला निकालही लागला. त्यानंतर पुणे लोकसभेचे उमेदवार गिरीश बापट यांचे २९ मार्चला निधन झाले. त्याला आता २ महिन्यांहून अधिक कालावधी झाला. मात्र, आयोगाने अजून पोटनिवडणूक जाहीर केलेली नाही. त्यामुळे आखाडाच रद्द करण्याच्या शक्यतेला पुष्टी मिळत आहे.
कारणे काय?
- लोकसभेच्या सध्याच्या सभागृहाची मुदत संपण्याला केवळ वर्षांचा कालावधी शिल्लक आहे. त्यातही निवडणुकीचा कार्यक्रम लक्षात घेतला तर तसे ९ महिनेच बाकी आहेत. त्यामुळे इतक्या कमी कालावधीसाठी पोटनिवडणूक घेतली जाईल, अशी शक्यता कमी दिसत आहे.
- राजकीय स्थितीचाही सत्ताधाऱ्यांकडून विचार केला जात आहे. कसबा विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा पराभव झाला. ताेही ११ हजार मतांच्या फरकाने झाला. त्यानंतर कर्नाटक विधानसभा निवडणुकीतही ते राज्य भाजपच्या हातातून गेले. यातून जनमत सध्या बरोबर नसल्याची भीती भाजपमध्ये आहे.
- सर्वेक्षण करणाऱ्या भाजपच्या काही खासगी संस्थांनी दिलेल्या अहवालातही तसे नमूद केल्याचे समजते. कोणत्याही निवडणुकीच्या आधी सर्व्हे करण्याची भाजपची सवय आहे. तोही किमान दोन संस्थांकडून केला जातो. तो अहवाल प्रतिकूल आला असल्याचे भाजपमधूनच सांगण्यात येते.
- पोलिसांच्या गुप्त वार्ता शाखेकडूनही सत्ताधारी अहवाल मागवत असतात. त्यातही सध्याची स्थिती जिंकण्यायोग्य नसल्याचे कळवल्याची माहिती मिळाली. या सर्व शक्यतांचा विचार करून पोटनिवडणूक न घेण्याच्या विचाराप्रत भाजपचे वरिष्ठ नेते आले असल्याचे बोलले जात आहे.
पोटनिवडणूक जाहीर होण्याआधीच रंगत
महाविकास आघाडीत काँग्रेसला जागा असूनही राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांनी या मतदारसंघात आमचे राजकीय वर्चस्व जास्त आहे असे म्हणत या जागेवर दावा केल्याने निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याआधीच त्यात रंगत आली आहे. काँग्रेसने लगेचच हा दावा खोडून काढला. कसबा विधानसभेतील विजयामुळे महाविकास आघाडीतील सर्वच राजकीय पक्षांंचा आत्मविश्वास वाढला आहे तर भाजपकडून त्यांच्यात फूट कशी पाडता येईल यावर विचार सुरू आहे.
राजकीय स्थिती प्रतिकूल आहे, तसा सर्व्हे किंवा अहवाल आहे या अफवा आहेत. निवडणूक आयोग स्वायत्त आहे. ते स्वतंत्रपणे निर्णय घेतात. सरकारचा त्यात काहीही हस्तक्षेप नसतो. भाजपची संघटनाच इतकी बलवान आहे की, वर्षाच्या ३६५ दिवसांत कधीही निवडणूक झाली तरी आमची तयारी असते. एखादा पराभवाची इतक्या मोठ्या पक्षाला भीती बसेल हे कोणी म्हणत असेल तर म्हणोत; पण त्यात काहीही अर्थ नाही. केंद्र सरकार, राज्य सरकार उत्कृष्ट काम करत आहे आणि निवडणूक कधीही झाली तरी आम्ही सज्ज आहोत.
- जगदीश मुळीक, शहराध्यक्ष, भाजप
आम्ही महाविकास आघाडी म्हणूनच ही निवडणूक लढणार आहोत. आघाडीच्या जागा वाटपात ही जागा काँग्रेसकडे आहे. ती पूर्वापार आमचीच आहे. मागील दोन पराभव वगळता त्याआधी अनेक वर्षे पुणे लोकसभा मतदारसंघावर काँग्रेसचेच वर्चस्व होते. पोटनिवडणूक कधीही झाली तरी आमची तयारी आहे. अलीकडे केंद्र सरकारचा हस्तक्षेप प्रत्येक स्वायत्त संस्थेत होत असतो. त्यामुळे एकूण राजकीय स्थिती पाहता निवडणूक होईल, असे काँग्रेसच काय, सर्वच विरोधी पक्षांना वाटत आहे.
- मोहन जोशी, प्रदेश उपाध्यक्ष, काँग्रेस