पिंपरी :पुणे-लोणावळा लोकल दिवसभर धावणे, घाट भागात नवीन तंत्रज्ञान वापरून बदल करणे, कर्जत-पनवेल लोकल रेल्वे मार्गाच्या कामाला गती दिली जाईल, अशी हमी रेल्वेमंत्री वैष्णव यांनी दिली. संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. त्यात खासदार बारणे यांनी मतदारसंघातील रेल्वे प्रश्नांकडे सरकारचे लक्ष्य वेधले होते. त्याची तत्काळ दखल रेल्वेमंत्री वैष्णव यांनी घेतली. प्रलंबित प्रश्नांचा आढावा घेऊन कामे तत्काळ मार्गी लावण्याची ग्वाही दिली.
खासदार बारणे म्हणाले, ‘‘सिंहगड एक्स्प्रेसचे कोच वाढवावेत. पुणे-लोणावळा दरम्यान लोकल रेल्वे दिवसभर धावावी. लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांना लोणावळा, कर्जत स्थानकावर थांबा मिळावा. मावळ लोकसभा मतदारसंघात सुरू असलेली रेल्वे अंडरपास, ओव्हर ब्रीज, नेरळ रेल्वे स्टेशनच्या कामाला गती द्यावी याबाबत सभागृहात आवाज उठविला.’’
अधिकाऱ्याविषयी तक्रार
वैष्णव यांनी बोलावून घेत रेल्वेच्या प्रश्नांबाबत चर्चा केली. पुणे विभागाच्या तत्कालीन विभागीय रेल्वे व्यवस्थापकांच्या कार्यकाळात रेल्वेची कामे अतिशय संथगतीने सुरू होती. तक्रारींवर अधिकारी व्यवस्थित उत्तरे देत नाहीत. उद्धटपणे बोलतात, अशा तक्रारी बारणे यांनी केल्या. त्यावर रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले, ‘‘संबंधितांची बदली केली आहे. सेवा पुस्तकात नोंद करण्यात येईल.’’