पुणे: महामेट्रोने त्यांच्या भूयारी स्थानकाच्या कामासाठी पाडलेल्या शिवाजीनगर एसटी स्थानकाच्या विषयावर आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी विचारलेल्या प्रश्नाला मंत्री दादा भूसे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वतीने, महामट्रोचे शिवाजीनगर एसटी स्थानक नव्याने बांधून देणार आहे असे आश्वासन दिले. महामेट्रोने त्यांच्या भूयारी स्थानकाच्या कामासाठी आधीचे एसटी स्थानक पाडले असून त्यामुळे ते दोन वर्षांपूर्वी वाकडेवाडीला स्थलांतरीत करण्यात आले आहे.
शहरापासून हे स्थलांतरीत स्थानक बरेच दूरवर आहे. त्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो आहे. महामंडळ व महामेट्रो यांच्यात झालेल्या करारानुसार पाडलेले स्थानक एसटी महामेट्रोच पुन्हा नव्याने बांधून देणार आहे. मात्र महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये तत्कालीन मंत्र्यांनी याजागेवर महामंडळच स्थानकासह व्यापारी संकूल बांधणार अशी भूमिका घेतली असल्यामुळे काम रखडले असल्याची चर्चा आहे.
मंत्री भूसे यांनी महामेट्रोच एसटी स्थानक बांधून देणार आहे असे सांगितले असले तरी प्रत्यक्ष जागेवर मात्र अजून सगळी स्थिती जैसे थे च आहे. महामेट्रोचे भूयारी स्थानक बांधून पूर्ण झाले आहे. आता त्यांनी वरील बाजूल स्थानक बांधण्यास सुरूवात करायची आहे. मात्र मंत्रीमंडळात परिवहन मंत्रीच नाहीत. ज्या खात्याला मंत्री नाही ती खाती मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे आहेत. एसटी महामंडळातील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की नवे स्थानक, त्याची रचना हा सगळा विषय गंभीर आहे. त्यावर मंत्री स्तरावर चर्चा होणे गरजेचे आहे, मात्र मागूनही मंत्र्यांचा वेळ मिळत नसल्याने अडचण येत आहे.