पुणे : महापालिका मुख्यालयाच्या वरच्या मजल्यावरील वाहनतळात अडकलेल्या एका कुत्र्याच्या पिल्लाला वाचवताना कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी घडली. बाबूराव बसप्पा कांबळे (वय ५०) असे मृत्यूमुखी पडलेल्या पालिका कर्मचाऱ्याचे नाव आहे. ते पालिकेच्या लेखा विभागात वरिष्ठ कारकून म्हणून कार्यरत होते. अंदाजपत्रकाचे काम सुरू असल्यामुळे या विभागातील काही कर्मचारी सुटीच्या दिवशीही मुख्यालयात कामासाठी म्हणून आले होते. सायंकाळी चहा प्यायला म्हणून ते मुख्यालयाबाहेर आले. चहा घेऊन झाल्यावर परत इमारतीत येताना कांबळे यांना वाहनतळाच्या वरच्या मजल्यावरून एका कुत्र्याच्या पिल्लाच्या ओरडण्याचा आवाज आला. गेटमध्ये अडकलेल्या कुत्र्याच्या पिलाला बाहेर काढण्यासाठी ते वरच्या मजल्यावर गेले. परंतु, पिल्लाची सुटका करताना अचानक पाय घसरून ते इमारतीवरून खाली पडले. यामध्ये त्यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली. त्यांना तातडीने सुर्या रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. कांबळे यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा ,दोन मुली असा परिवार आहे. कांबळे हे वडगाव धायरी या भागात राहत होते. तसेच महापालिका कामगार युनियनचे ते सक्रिय प्रतिनिधी व अविनाश कर्नाटक मंडळाचे ते माजी अध्यक्ष देखील होते.
कुत्र्याच्या पिल्लाला वाचवताना महापालिकेच्या कर्मचाऱ्याचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2018 10:50 PM