पुणे- भीमा-कोरेगावमध्ये झालेल्या घटनेनंतर आज (बुधवार, 3 जानेवारी) महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन बंदची घोषणा केली. हा बंद शांततेत करण्याचं आवाहन त्यांनी केलं. महाराष्ट्र बंदच्या आवाहनाला राज्यात ठिकठिकाणी प्रतिसाद मिळताना दिसतो आहे.
पुण्यामध्ये एसटी वाहतुकीवर परिणाम झाला असून पुण्यातील स्वारगेट, शिवाजीनगर, पुणे स्टेशन बस स्थानकावर प्रवाशांची तुरळक गर्दी पाहायला मिळाली. नेहमी गजबजलेला स्वारगेट बस स्थानकात मोजकेच प्रवासी दिसून येत होते. पुणे- सातारा, पुणे- बारामती बससेवा स्थगित करण्यात आली आहे. तर शहरातील अनेक शाळांनी शाळेत आलेल्या मुलांना पुन्हा घरी पाठवलं. कात्रज भागात सकाळी स्कूल व्हॅन अडविण्याच्या घटना घडली होती.
पुणे शहरात शांतता पाहायला मिळत असून दुकानं, मॉल बंद आहेत तसंच बहुतांश शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. रस्त्यावर वाहतूकही कमी पाहायला मिळते आहे.