पुणे : राष्ट्रीय महामार्गापासूनच्या ५०० मीटर आतमधील वाइन शॉप बंद केल्याने व्यवसायात तोटा झाल्याने मॅनेजरनेच आपल्याला लुटल्याचा बनाव रचल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे़ न्यायालयाच्या आदेशाने वाइन शॉप बंद झाल्याने गेली ४ ते ५ महिने त्यांचा पगार बंद झाला होता़वाइन शॉपची रोकड घेऊन जाणाºया दुचाकीस्वाराच्या डोळ्यात मिरची पावडर टाकून भरदिवसा पावणेसहा लाखांची रोकड लुटल्याची घटना सोमवारी दुपारी साडेतीन वाजता कर्वेनगर रस्त्यावरील ताथवडे उद्यानासमोर घडली होती़ अलंकार पोलिसांनी केलेल्या तपासात मॅनेजरनेच हा बनाव केल्याचे उघडकीस आले आहे़राकेश लक्ष्मणसिंह परदेशी (वय ३६, रा़ प्रसाद बिबवेवाडी) असे या मॅनेजरचे नाव आहे़ पोलिसांनी त्याला अटक केली आहे़याबाबत पोलिसांनी सांगितले की, राकेश परदेशी हे एका वाइन शॉपमध्ये मॅनेजर आहे. शुक्रवार ते रविवार अशी तीन दिवसांची वाइन शॉपची जमा झालेली ५ लाख ६८ हजार रुपयांची रोख रक्कम घेऊन बँकेत भरण्यासाठी ते दुचाकीवरून निघाले होते. दरम्यान, ते ताथवडे उद्यानाजवळ आले असता एका व्यक्तीने त्यांना गाडीचे चाक पंक्चर झाल्याचे खोटे सांगितले. त्यांनी थांबून गाडीवर बसूनच पाठीमागील टायर पंक्चर झाले आहे का, याची पाहणी करीत असताना त्या चोरट्याने डोळ्यांत मिरची पावडर टाकली आणि गळ्यात अडकवलेली काळ्या रंगाची बॅग जबरदस्तीने चोरून नेली़ परदेशी यांनी मदतीसाठी आरडाओरडा केला़ मात्र तोपर्यंत चोरटा पसार झाला होता़ अलंकार पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. परिमंडळ एकचे उपायुक्त बसवराज तेली यांनी घटनास्थळी भेट दिली.सिंहगड रोडला एका वाइन शॉपमध्ये परदेशी मॅनेजर आहे़ पण, सर्वोच्च न्यायालयाने महामार्गापासून ५०० मीटरच्या आत असलेली सर्व मद्यविक्री दुकाने बंद करण्याचा आदेश दिल्याने त्यांचे दुकान बंद झाले़ त्यामुळे त्यांचा पगारही बंद झाला होता़ त्यामुळे आर्थिक चणचण त्याला जाणवत होती़ त्यातून टीव्हीवर पाहून व बातम्या वाचून त्याने हा लुटीचा बनाव आखला़ वाइन शॉपमधून पैसे घेऊन बाहेर पडल्यानंतर त्याने त्यातील पैसे आपल्या दुसºया खात्यात भरले व त्यानंतर घटनास्थळी येऊन आपल्याला लुटल्याचा आरडाओरडा केला़ पोलिसांनी त्याला अटक केली आहे़
पुणे: भरदिवसा पावणेसहा लाखांची रोकड लुटल्याचा तो बनाव, व्यवसायात तोटा झाल्याने मॅनेजरचं कृत्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2017 6:53 AM