पिंपरी : जुळ्या मुलींना जन्म देऊन संकटात सापडलेली विवाहिता जिद्दीने परिस्थितीला तोंड देत आहे. एक बाळ दगावले, दुस-या बाळाला वाचविण्याचे तिचे प्रयत्न सुरू आहेत, हे प्रयत्न तोकडे पडू लागले आहेत. खासगी रूग्णालयातील खर्च परवडेना, म्हणुन शासकीय रूग्णालयांचे दरवाजे ठोठावले. ‘प्री-मॅच्युअर’ असल्याने बाळाची प्रकृती नाजुक असून त्याला अतिदक्षता विभागात दाखल करावे लागणार आहे. मात्र शासकीय रूग्णालयांमध्ये जागा उपलब्ध नाही, असे सांगितले जात असल्याने त्याच रूग्णालयात थांबणे भाग पडले आहे. विवाहितेने,तिच्या आईवडिलांनी डॉक्टरांपुढे हात जोडले. आतापर्यंतचा वैद्यकीय खर्च रूग्णालयाने माफ केला आहे. यापुढील खर्च मात्र तिला करावा लागणार आहे.
पंजाबीज् वेल्फेअर असोसिएशनचे पदाधिकारी हरेश मन्ना यांनी मंगळवारी ‘लोकमत’ कार्यालयास भेट देऊन संबंधित महिलेची माहिती घेतली. वरिष्ठ पदाधिकारी सुरेंद्र वाधवा यांच्याशी संपर्क साधून फौंडेशनतर्फे महिलेला मदत देण्याची तयारी त्यांनी दाखवली. अद्याप त्यांच्याकडून तिला मदत मिळालेली नाही. पिंपरीतील रूग्णालय व्यवस्थापनाने तिला शासकीय योजनेचा लाभ मिळवुन देण्याचा प्रयत्न केला. रेशनिंग कार्ड अमृतसर येथील असल्याने दुर्बल घटकातील नागरिकांना वैद्यकीय अर्थसहाय्य देण्याच्या राज्य शासनाच्या योजनेचा लाभ देण्यास अडचणी आल्या. परिस्थितीवर मात करण्याची तिची धडपड लक्षात घेऊन रूग्णालय व्यवस्थापनाने तिचा प्रसूतीचा खर्च तसेच बाळासाठीच्या आतापर्यंतचा 13 दिवसांचा वैद्यकीय उपचाराचा खर्च माफ केला आहे. मात्र यापुढे येणारा खर्च द्यावा लागेल,असे सांगितले आहे, यापुढील खर्च तरी कसा करायचा? या विवंचनेत ती पडली आहे.
व्हॅलेन्टाईन दिनी मिळाला प्रतिसाद-
प्रेमविवाह केलेल्या पतीला निदान व्हॅलेन्टाईनदिनी तरी आठवण येते का? हे जाणून घेण्यासाठी तिने स्वत:हून पतीशी संपर्क साधला. जुळ्या मुलींना जन्म दिल्याने नाराज झालेल्या पतीला तिने प्रसूतीनंतर तिच्यावर बेतलेली आपबिती कथन केली. पाषाण हदयी माणसाला आतातरी प्रेमाचा पाझर फुटेल अशी तिची आशा होती. त्याने फोनवर प्रतिसाद दिला, तीन चार दिवसात पुण्यात येतो. असे सांगितल्याने विवाहितेला थोडा दिलासा मिळाला आहे.