लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : शालेय विद्यार्थ्यांसाठीच्या बस भाडेवाढ प्रकरणी आयोजित संयुक्त बैठकीला पुणे महानगर परिवहन निगमचे (पीएमपीएल) व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे आलेच नाहीत. त्यामुळे संतप्त झालेल्या महापौर मुक्ता टिळक व अन्य पदाधिकाऱ्यांनी मुंढे यांचा निषेध केला. मुंढे यांना परत बोलवावे, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात येणार असल्याचे महापौरांनी सांगितले.बसभाडे दरवाढ प्रकरणी तोडगा काढण्यासाठी महापौर टिळक यांनी मुंढे यांना बैठकीसाठी बोलावले होते. बुधवारी दुपारी ४ वाजता ही बैठक होणार होती. आयुक्त कुणाल कुमार यांनी मुंढे यांच्याबरोबर चर्चा करून ही वेळ ठरवली होती व तसे सर्वसाधारण सभेत जाहीर केले होते. मात्र मुंढे बैठकीला आलेच नाहीत. त्यांनी दोन सहायक अधिकाऱ्यांना बैठकीसाठी पाठवून आपण कामकाजामुळे येऊ शकत नाही असा निरोप पाठवला. त्यामुळे महापौर टिळक व पदाधिकारी संतप्त झाले. त्यांनी दोन्ही अधिकाऱ्यांना परत पाठवून दिले. त्यांना कसलाही अधिकार नाही, त्यांच्याबरोबर चर्चा करणार नाही असे त्यांनी सांगितले.
तुकाराम मुंढे यांच्यावर पुण्याच्या महापौर नाराज
By admin | Published: June 29, 2017 1:42 AM