पुणे : तब्बल ७९ कोटी रुपयांचा जीएसटी बुडविल्याप्रकरणी पुण्यातील एका व्यापाऱ्यास मुंबईतून अटक करण्यात आली आहे. जीएसटी कायद्यांतर्गत करण्यात आलेलेली पुण्यातील ही पहिलीच कारवाई आहे. जीएसटीच्या पुणे झोनल युनिटकडून ही कारवाई केली.
मोदसिंग पद्मसिंह सोढा असे अटक करण्यात आलेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे. न्यायालयात हजर केले असता त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. सोढा याने १० बनावट कंपन्या स्थापन केल्या असून त्याद्वारे ४१५ कोटी रुपयांचे केवळ कागदी व्यवहार केले आहे. या प्रकरणात एकूण ८० कोटी रुपयांची फसवणूक झाल्याची शक्यता आहे. वस्तू न पुरवता देण्यात आलेल्या पावत्यांच्या आधारे हा घोळ करण्यात आला आहे. अशा प्रकारचे व्यवहार करून त्याद्वारे काळा पैसा निर्माण करण्यात येत असल्याची शक्यता युनिटने व्यक्त केली आहे.
युनिटला मिळाल्या माहितीनुसार, चौकशी केली असता काही व्यक्ती जीएसटी नोंदणी करून त्याआधारे बनावट बिलांद्वारे खोटे इनपुट टॅक्स क्रेडिट निर्माण करीत असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानुसार मोठ्या प्रमाणात डेटा विश्लेषित केल्यानंतर या रॅकेटमधील काही प्रमुख व्यक्तींची नावे मिळाली होती. त्यामुळे पुणे आणि मुंबईमध्ये विविध ठिकाणी छापे टाकण्यात आले होते. त्यावेळी सोढा यांना अटक करण्यात आली आहे. युनिटने केलेल्या पहिल्याच तपासणीमध्ये या बनावट कंपन्यांकडून २ कोटी १८ लाख रुपयांचा जीएसटी जमा करण्यात आला आहे. अशा कंपन्यांच्या माध्यमांतून सरकारची मोठ्या प्रमाणात फसवणूक करण्यात येत असून अनेक कंपन्यात त्यात सहभागी आहेत. अशी कामे करण्यारे एक मोठे रॅकेट सक्रिय असून त्याची व्याप्ती देशभर पसरली आहे, अशी माहिती युनिटकडून देण्यात आली.
याप्रकरणातील २२० कोटी रुपयांच्या फसव्या आयटीसी आढळल्या असून त्याचा आकडा आणखी वाढणार आहे. तर बोगस बिलांच्या आधारे सुमारे ९०० कोटी रुपयांचा व्यवहार झाल्याचे दिसते. त्यांचा उपयोग भविष्यात बँकांकडून कर्ज मिळविण्यासाठी केला जाऊ शकतो. विभागाचे अतिरिक्त महासंचालक राजेश पांडे आणि अतिरिक्त संचालक विक्रम वनी यांच्या मार्गदर्शनाखाली युनिटच्या उपसंचालक राजलक्ष्मी कदम, वरिष्ठ गुप्तचर अधिकारी प्रशांत रोहनेकर, पुण्यातील युनिटचे प्रमुख पी. एम. देशमुख, के. आर. मूर्ती, डी. बी. मोरे, हिमांशु कुशवाह आणि अंकुर सिंगला यांनी ही कारवाई केली.
कोणतीही व्यक्ती कोणत्याही प्रकारचा कर बुडवत असेल तर त्यांची माहिती जीएसटीच्या सीटीएस क्रमांक १४, प्लॉट क्रमांक १६ ए, फिनिक्स बिल्डिंग, ओ. रेजीडेंसी क्लब, बंड गार्डन रोड येथील कार्यालयात द्यावी, असे आवाहन युनिटकडून करण्यात आले आहे.