पुणे : शिवाजीनगर हिंजवडी या मेट्रो मार्गाचे खांब उभारणीचे काम अंतिम टप्प्यात आहे. २३.३ किलोमीटर अंतराच्या हा मेट्रो मार्ग एकूण ९२३ खांबांवर असणार आहे, त्यापैकी ७१५ खांब उभारून तयार झाले आहेत. त्यावर मेट्रो मार्गासाठी टाकाव्या लागणाऱ्या पाईल कॅपही बांधण्यात आल्या आहेत. उर्वरित खांब दिवाळीच्या आधी पूर्ण करण्याचा ठेकेदार कंपनीचा प्रयत्न आहे.
हिंजवडीच्या आय टी हबमध्ये काम करणाऱ्यांसाठी ही मेट्रो दिलासा ठरणार आहे. शिवाजीनगर ते हिंजवडी या रस्त्यावरील वाहतूक कमी होण्यासाठी मेट्रोचा उपयोग होणार आहे. पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाच्या ( पीएमआरडीए) माध्यमातून पीपीपी ( पब्लिक प्रायव्हेट पार्टनिरशिप) तत्वावर या मेट्रोचे काम सुरू आहे. त्यासाठी पुणे आयटीसिटी मेट्रो रेल लिमिटेड ही विशेष कंपनी स्थापन करण्यात आली आहे. खासगी कंपनीकडे निविदेच्या माध्यमातून काम देण्यात आले असून ते पूर्ण झाल्यावर त्यांच्याकडेच मेट्रोचे संचलन पुढील ३५ वर्षांसाठी देण्याचा करार करण्यात आला आहे.
या मेट्रोच्या प्रत्येक खांबाचा व्यास २००० मिलिमिटर व्यासाचा आहे. उच्च दर्जाच्या काँक्रिटच्या साह्याने तो तयार करण्यात आला आहे. दोन खांबांमधील अंतर सेगमेंटने (सिमेंट क्राँक्रिटच्या पट्ट्या) भरून काढण्यात येईल. त्यावर मग मेट्रोचे रूळ टाकण्यात येणार आहेत. सेगमेंट तयार करण्याचे काम कास्टिंग यार्डमध्ये सुरू आहे. ते तिथून प्रत्यक्ष जागेवर आणून बसवण्यात येतील. उर्वरित खांबांचे काम पूर्ण होत असतानाच आता त्यावर सेगमेंट टाकण्याचे कामही सुरू करण्यात येणार आहे.