पुणे :मेट्रो स्थानकाच्या काही निवडक ठिकाणी कौशल्यासंबंधी त्रुटी आढळल्या; परंतु स्थानकांची संरचना (स्ट्रक्चर) संपूर्णत: सुरक्षित आहे, असा दावा महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडच्या वतीने करण्यात आला आहे.
नळस्टॉप ते वनाज या मेट्रो मार्गासह पीसीएमसी स्थानक मार्गावरील स्ट्रक्चरच्या कामाचा दर्जा ‘सुमार’ असून, मेट्रो कंपनीच्या निष्काळजीपणामुळे पुणेकरांचा जीव धोक्यात आहे, असे सांगत हैदराबाद मेट्रो रेल लिमिटेडचे माजी व्यवस्थापकीय संचालक विवेक गाडगीळ, कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडचे माजी व्यवस्थापकीय संचालक डॉ. केतन गोखले, सिव्हिल इंजिनिअर, प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट शिरीष खसबरदार आणि स्ट्रक्चरल इंजिनिअर नारायण कोचक यांनी पुण्यातील मेट्रो स्थानक स्ट्रक्चरचा दर्जा आणि सदोष डिझाइनबाबत काही निरीक्षणे नोंदवीत नाराजी व्यक्त केली केली आहे, या आशयाचे वृत्त ‘लोकमत’ने सोमवारी (दि.१३) प्रसिद्ध केले आहे.
त्याबाबत महामेट्रोने कामाबाबत स्पष्टीकरण देताना सांगितले की, पुणे मेट्रो स्थानक बांधण्याच्या दोन कंत्राटांमध्ये महामेट्रोला कामाच्या अंमलबजावणीदरम्यान उणिवा आणि अपयश आल्याचे निदर्शनास आले. कंत्राटदारांना उणिवा आणि अपयश कळविण्यात आले होते; परंतु कंत्राटदार त्या उणिवा दुरुस्त करण्यात वारंवार अपयशी ठरले. परिणामी महामेट्रोने आवश्यक दंड आकारून दोन्ही करार संपुष्टात आणले. करार संपुष्टात आणल्यानंतर महामेट्रोने उर्वरित कामे पूर्ण करण्यासाठी आणि प्रकल्पाच्या दिलेल्या वेळेत काम पूर्ण करण्यासाठी जलद कार्यवाही केली आहे.
दरम्यान, महामेट्रोला नारायण कोचक, शिरीष खसबरदार, विवेक गाडगीळ आणि डॉ. केतन गोखले यांनी संयुक्तरीत्या लिहिलेले पत्र प्राप्त झाले आहे. महामेट्रोने त्यांचे आभार मानले आहेत आणि त्यांना सांगितले आहे की, काही निवडक ठिकाणी कौशल्यासंबंधी (वर्कमनशिप) त्रुटी आढळल्या; परंतु स्थानकाची संरचना संपूर्णत: सुरक्षित आहे. याशिवाय महामेट्रोने माहिती दिली की दुरुस्तीची कामे आधीच प्रगतिपथावर आहेत आणि शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय (सीओईपी) यांना हे दुरुस्तीचे काम प्रमाणित करण्यासाठी सांगितले आहे. अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या टीमने या कामाला नुकतीच सुरुवात केली आहे.