पुणे : पुणे आणि पिंपरी चिंचवड मेट्रो स्थानकावरून नाव बदलण्याची मागणी सुरु आहे. पिंपरी चिंचवडमधील भोसरी स्टेशनच्या नावावरून नवा वाद निर्माण झाला होता. या भागातील भोसरी स्टेशनचे नाव बदलण्याची मागणी नागरिकांनी केली होती. त्यानंतर शहरातील बुधवार पेठ मेट्रो स्थानकाच्या नावात चूक झाल्याचे महामेट्रोच्या प्रकल्प अहवालातून समोर आले होते.
पुण्यातील मध्यवर्ती भागात येणाऱ्या बुधवार पेठेत मेट्रो स्थानक तयार होणार होते. त्यानुसार महामेट्रोच्या प्रकल्प अहवालात बुधवार पेठ मेट्रो स्टेशन नाव देण्यात आले. मात्र जागेअभावी बुधवार पेठेत स्टेशन तयार करणं अवघड होते. त्यामुळे ते हलवून कसबा पेठेत साततोटी पोलीस चौकीजवळ स्थानकाचे काम सुरु करण्यात आले. परंतु अहवालात मात्र स्थानकाच्या नावाचा बदल केला नाही. दोन्ही पेठांमध्ये बरेच अंतर असल्याने या स्थानकाचे नाव चुकीचं असल्याचे समोर आले आहे. बुधवार पेठ नाव बदलण्याची शक्यता
पुणे मेट्रोच्या बुधवार पेठ स्थानकांचे नाव बदलून कसबा पेठ आणि केले जाण्याची शक्यता आहे. त्यासंबंधीचा प्रस्ताव महामेट्रोने राज्य सरकारसह केंद्र सरकारकडे पाठविला आहे. तो मंजूर झाल्यानंतर या स्थानकांची नावे बदलण्याची अधिसूचना काढण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. आयडीयलचेही नाव बदलणार वनाझ ते रामवाडी मार्गिकेवरील 'आयडियल कॉलनी' स्थानक पौड फाटा, केळेवाडी या ठिकाणी आहे; परंतु, आयडियल कॉलनी या स्थानकापासून काही अंतरावर आहे. त्यामुळे या स्टेशनचे नाव बदलण्याची मागणी केली जात होती. त्यानुसार या प्रस्तावात आयडियल कॉलनीचे नाव बदलण्याचा मुद्दाही नमूद करण्यात आला आहे.
भोसरी स्थानकाच्या नावावरूनही गोंधळ भोसरी स्थानकामुळे प्रवाशांमध्ये विशेषत: गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. पुणे-मुंबई महामार्गालगत नाशिक फाटा येथे हे स्थानक असताना त्याला ‘भोसरी स्टेशन’ असे नाव देण्यात आले आहे. त्या स्थानकापासून भोसरी स्टेशन जवळपास १० किलोमीटर लांब आहे. त्यामुळे प्रवाशांना अडचणी येत आहेत. स्थानिक नागरिकांना भोसरी आणि नाशिक फाटा या भागाबद्दल माहिती आहे, परंतु नवीन माणसाचा स्टेशनच्या नावावरून गोंधळ होण्याची शकयता आहे. परंतु हे नाव बदलण्याबाबत कुठलाही विचार नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.