राजू इनामदार
पुणे: महामेट्रोने आता डेक्कन व छत्रपती संभाजी उद्यान स्थानकांच्या कामावर लक्ष केंद्रित केले आहे. या स्थानकांमध्ये येण्यासाठी जंगली महाराज रस्त्यावरून दोन पादचारी मार्ग असतील. त्याशिवाय शहराच्या मध्य भागातील प्रवासी मिळावेत यासाठी नारायण पेठेतूनही नदीपात्रावरून थेट छत्रपती संभाजी उद्यान स्थानकात येण्यासाठी फूट ओव्हरब्रिज असेल. नदीपात्रामध्ये मेट्रोच्या खांबाचा आधार घेत रिव्हर साईड ब्रिज बांधण्यात येणार आहे.
आकर्षक रचना
शहराच्या सर्वाधिक गर्दीच्या भागातील मेट्रोची ही दोन्ही स्थानके आकर्षक करण्यासाठी महामेट्रो प्रयत्न करत आहे. डेक्कन व छत्रपती संभाजी उद्यान या दोन्ही स्थानकांचा बाह्याकार शिंदेशाही पगडीसारखा असणार आहे. तशी खास रचना करण्यात आली आहे. त्याशिवाय पुण्याच्या इतिहासाशी संबधित म्यूरल्स, चित्र, दोन्ही स्थानकांमध्ये असतील.
रस्त्यावरून दोन पादचारी मार्ग
या दोन्ही स्थानकांमध्ये त्यांच्या आसपासच्या रस्त्यांवरील प्रवाशांना येणे-जाणे सुलभ व्हावे यासाठी स्काय वॉक तयार करण्यात येत आहेत. बालगंधर्व रंगमंदिराच्या बरोबर समोरून एक पादचारी मार्ग छत्रपती संभाजी उद्यान स्थानकात जाईल. घोले रस्त्यावरील प्रवाशांना त्यामुळे छत्रपती संभाजी उद्यान स्थानकात जाणे सहज शक्य होणार आहे. डेक्कन स्थानकात जाण्यासाठीही असाच पादचारी मार्ग तयार करण्यात येत आहे. तो खंडूजी बाबा चौकातून डेक्कन स्थानकात जाईल.
नारायण पेठ ब्रिज
शहराच्या मध्यभागातील प्रवासी मेट्रोला मिळावेत, यासाठी नारायण पेठतून तारांचा एक ब्रीज थेट छत्रपती संभाजी उद्यान स्थानकात जाण्यासाठी तयार होत आहे. तारांच्या साह्याने बांधण्यात येणाऱ्या या पुलाला मध्यभागात वीणेसारखा आकार दिला आहे. पेठांमधील प्रवासी या मार्गाने थेट स्थानकात पोहोचू शकतील.
रिव्हर साइड ब्रीज
डेक्कन स्थानक ते छत्रपती संभाजी उद्यान स्थानक हे पूर्ण अंतर नदीपात्रातून आहे. ५९ खांबांवर मेट्रोचा नदीपात्रातील पूल उभा आहे. मेट्रोच्या बरोबर खालील बाजूने मेट्रोच्याच खांबांना धरून एक रिव्हर साइड ब्रीजही बांधण्यात येणार आहे. त्यावरून छत्रपती संभाजी उद्यान व डेक्कन अशा दोन्ही स्थानकांमध्ये जाता येता येईल. वरून छत असलेला हा पूल पादचाऱ्यांना फिरण्यासाठीही खुला ठेवण्यात येणार आहे.
कामाला गती
त्याचबरोबर, स्थानकांचीही कामे गतीने करण्यात येत आहेत. वनाज ते गरवारे महाविद्यालय हे अंतर फक्त ५ किलोमीटरचे असल्याने प्रवाशांकडून त्याचा अपेक्षित वापर होत नाहीये, असे लक्षात आल्यामुळे महामेट्रोने आता हा मार्ग थेट छत्रपती संभाजी उद्यान स्थानकापर्यंत तयार करण्याकडे लक्ष दिले आहे. त्यामुळे कोथरूडमधून रोज डेक्कनला यावे लागणारे प्रवासी मोठ्या संख्येने मिळतील, असा अंदाज आहे.
''पुण्याच्या सर्वाधिक गर्दीच्या भागाचा चेहरामोहराच या नव्या बांधकामामुळे बदलणार आहे. मेट्रोचा हा मार्ग लवकर सुरू व्हावा, यासाठी महामेट्रो प्रयत्नशील आहे. स्थानके व सर्व पूल आकर्षक व अत्याधुनिक असतील असे अतुल गाडगीळ ( संचालक, प्रकल्प) यांनी सांगितले.''