पुणे : पुण्यात ठिकठिकाणी मेट्राेचे काम सुरु आहे. स्वारगेट भागात मेट्राेकडून ट्रान्सपाेर्ट हब तयार करण्यात येत आहे. त्यासाठी खाेदकाम सुरु आहे. हे काम सुरु असताना मेट्राेला एक पुरातन भुयार स्वारगेट भागात आढळून आले. दुसरीकडे गेल्या अनेक दिवसांपासून काॅंग्रेसला पुण्यात उमेदवार सापडत नाही. त्यामुळे आता साेशल मीडियावर उपराेधिक टीका केली जात आहे. पुणे मेट्राेला पुण्यात भुयार सापडलं परंतु काॅंग्रेसला उमेदवार सापडेना असे स्टेट्स आज दिवसभर साेशल मीडियावर फिरत हाेते.
स्वारगेटच्या चाैकात मेट्राेकडून मल्टिट्रान्सपाेर्ट हब उभारण्यात येत आहे. या हबचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते काही महिन्यांपूर्वी करण्यता आले हाेते. सध्या या ठिकाणी खाेदकाम सुरु आहे. हे काम सुरु असताना मेट्राेला ब्रिटीशकालीन भुयार सापडले आहे. हे भुयार पाणी वाहून नेण्यासाठी वापरण्यात येत असल्याचा अंदाज इतिहास संशाेधक वर्तवत आहे. ही बातमी सर्वप्रथम लाेकमतने प्रकाशात आणली. आज दिवसभर पुण्यात याच भुयाराची चर्चा हाेती. पुण्यात काॅंग्रेसचा लाेकसभा निवडणुकीसाठी काेण उमेदवार असणार याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून काॅंग्रेसच्या कार्यकर्त्यांना केवळ प्रतिक्षाच करावी लागत आहे. प्रचाराचे नियाेजन करणाऱ्यासाठी बैठका हाेत आहेत परंतु प्रचार नेमका काेणाचा करायचा या संभ्रमात कार्यकर्ते आहेत. दुसरीकडे भाजपाने गिरीश बापट यांना उमेदवारी जाहीर करुन प्रचाराला सुरुवात देखील केली.
त्यातच राेज नवनवीन नावे चर्चेत येत आहेत. आज लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांना काॅंग्रेस तिकीट देणार अशा चर्चा रंगल्या हाेत्या. अरविंद शिंदे यांच्या कार्यकर्त्यांनी तर त्यांच्या प्रचाराची तयारी देखील केली हाेती. परंतु अद्याप काॅंग्रेसचा निर्णय हाेत नसल्याचे चित्र आहे. काल रात्री प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीत सुद्धा पुण्याच्या जागेचा उल्लेख नव्हता. त्यामुळे आता या सगळ्याला पुणेकर देखील कंटाळले असून साेशल मीडियावर लिहून व्यक्त हाेत आहेत.