पुणे:पुणेमेट्रोने आज गरवारे कॉलेज मेट्रो स्टेशन ते डेक्कन मेट्रो स्टेशन आणि फुगेवाडी मेट्रो स्टेशन ते दापोडी मेट्रो स्टेशन अशी पहिली ट्रायल रन घेतली. ती यशस्वीरित्या पार पडली. त्याचबरोबर पुणे मेट्रोने दैनंदिन प्रवासी संख्येचा ७० हजारांचा टप्पाही आज ओलांडला. आज १५ ऑगस्टला ७० हजार पेक्षा जास्त प्रवासी संख्या (संध्याकाळी 5 वाजेपर्यंत) पार केली. आता लवकरच डेक्कन ते वनाजपर्यंत पुणे मेट्रो व्यावसायिक तत्त्वावर धावणार असल्याचे पुणे मेट्रोकडून सांगण्यात आले आहे.
पुणे मेट्रोचे वनाझ स्थानक ते गरवारे कॉलेज स्थानक आणि पिंपरी चिंचवड महानगपालिका स्थानक ते फुगेवाडी स्थानक हे विभाग ६ मार्च २०२२ रोजी पंतप्रधानांच्या हस्ते पुणे मेट्रोच्या उद्घाटनानंतर कार्यान्वित करण्यात आले.
आज आझादी का अमृत महोत्सव आणि स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांच्या निमित्ताने, पुणे मेट्रोने रिच १ वरील फुगेवाडी मेट्रो स्टेशन ते दापोडी मेट्रो स्टेशन आणि रिच २ वरील गरवारे कॉलेज मेट्रो स्टेशन ते डेक्कन मेट्रो अशी पहिली चाचणी पूर्ण करून आणखी एक मैलाचा दगड गाठला आहे. या चाचणीला मोठे यश मिळाले आणि त्यामुळे येत्या काही महिन्यांत गरवारे कॉलेज मेट्रो स्टेशनच्या पलीकडे सिव्हिल कोर्ट स्थानक आणि फुगेवाडी स्थानक येथून शिवाजीनगर मेट्रो स्टेशनकडे मेट्रो सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
सध्या कार्यरत असलेल्या गरवारे कॉलेज मेट्रो स्थानकापासून डेक्कन मेट्रो स्थानकापर्यंत आणि परतीच्या प्रवासाला सकाळी १०.३० वाजता सुरुवात झाली. त्याचप्रमाणे फुगेवाडी स्थानकातून ते दापोडी मेट्रो स्थानकाकडे मेट्रो त्याच वेळेस धावली. दोन्ही गाड्यांचा ट्रायल रनचा वेग 15 किमी प्रती तास इतका होता आणि तो नियोजनाप्रमाने प्रमाणे पूर्ण झाला.