पिंपरी :पुणेमेट्रो प्रशासनाकडून देण्यात येत असलेल्या ‘एक पुणे कार्ड’ आणि ‘एक पुणे विद्यार्थी पास’ या दोन्ही कार्डला दिवसेंदिवस प्रतिसाद वाढताना दिसून येत आहे. आतापर्यंत ३८,७३४ जणांनी ‘एक पुणे कार्ड’ घेतले आहे. तर १०,४४४ जणांनी ‘एक पुणे विद्यार्थी पास’ कार्ड घेतले आहे. जास्तीत जास्त प्रवाशांनी स्मार्ट कार्डचा लाभ घ्यावा, असे आवाहन मेट्रो प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
मेट्रोने नुकताच दैनंदिन प्रवासी संख्येचा एक लाखांचा टप्पा ओलांडला आहे. मेट्रो प्रशासनाकडून प्रवाशांसाठी ऑफलाइन आणि किऑस मशीनद्वारे तिकीट काढण्याचा पर्याय उपलब्ध करुन दिला आहे. प्रवाशांची दररोज तिकिटाच्या रांगेत उभे राहण्यापासून सुटका करण्यासाठी मेट्रोकडून बहुउद्देशीय स्मार्ट कार्डही दिले जात आहे. सर्वसामान्य प्रवाशांना ‘एक पुणे कार्ड’ आणि विद्यार्थ्यांसाठी ‘एक पुणे विद्यार्थी पास’ कार्ड दिले जात आहे.
‘एक पुणे कार्ड’ धारकांना सोमवार ते शुक्रवार १० टक्के व शनिवार आणि रविवारी ३० टक्के सवलत दिली जात आहे. तर ‘एक पुणे विद्यार्थी पास’ कार्ड धारकांना आठवड्यातील सर्व दिवस ३० टक्के सवलत दिली जात आहे. या दोन्ही कार्डला दिवसेंदिवस प्रतिसाद वाढताना दिसून येत आहे. आतापर्यंत ३८,७३४ जणांनी ‘एक पुणे कार्ड’ घेतले आहे. तर १०,४४४ जणांनी ‘एक पुणे विद्यार्थी पास’ कार्ड घेतले आहे. स्मार्ट कार्ड घेण्यासाठी प्रवाशांनी मेट्रो संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज भरून नोंदणी करावी किंवा मेट्रो स्थानकांवर अर्ज भरून देण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.