पुणे: गणेशोत्सवाच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच अनंत चतुर्दशीला, पुणेमेट्रोने एक ऐतिहासिक कामगिरी बजावली आहे. शहरातील गणेश विसर्जन मिरवणुक बघण्यासाठी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी लाखो पुणेकरांनी मेट्रोने प्रवास करण्याला प्राधान्य दिलं. मंगळवारी (दि. १७) फक्त एकाच दिवसात तब्बल साडेतीन लाख प्रवाशांनी एका दिवसात मेट्रोने प्रवास करत नवीन रेकॉर्ड मोडला आहे. गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी पुणेकरांनी मेट्रोचा सोयीस्कर आणि वेगवान पर्याय निवडला.
अँक्वा लाईनवरून सर्वाधिक प्रवास
एकाच दिवसात ३ लाख ४६ हजार ६३३ प्रवाशांनी मेट्रोच्या पर्पल आणि अँक्वा लाईनवरून प्रवास केला. त्यातही अँक्वा लाईनवरून सर्वाधिक म्हणजे २ लाख ५३ हजार ७९० प्रवाशांनी प्रवास केला. विशेषत: लक्ष्मी रस्ता, शनिवारवाडा, आणि डेक्कन जिमखाना या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर प्रवासी वाहतूक झाली.
एकाच दिवसात मेट्रोला ५५ लाखांचा गल्ला
मेट्रो प्रशासनाने विसर्जनाच्या दिवशी विशेष तयारी केली होती. वाढीव फेऱ्या आणि अतिरिक्त कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली होती. मंगळवारी (दि. १७) एकाच दिवसात ५४ लक्ष ९२ हजार ४१२ रुपयांचे उत्पन्न मेट्रोला मिळाले आहे.
राजभरातून भाविक पुण्यात दाखल
पुण्याची विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी राज्यभरातून लाखो भाविक पुण्यात दाखल झाले. सकाळपासून मिरवणुकीची धुमधाम सुरु झाली. उन्हाचा कडाका असल्याने नागरिकांनी रस्त्यावर जास्त गर्दी केली नाही. परंतु सायंकाळी उत्साहात नागरिक विसर्जन सोहळ्यात सहभागी झाल्याचे दिसून आले. नागरिकांना प्रवासासाठी रस्ते बंद असल्याने मेट्रोची साथ मिळाली. मेट्रो विसर्जन मिरवणुकीच्या भागात फिरत असल्याने ते सोयिस्करही होते. म्हणून राज्यभरातून आलेल्या नागरिकांनी गणपती पाहण्यासाठी जास्तीत जास्त मेट्रोचा वापर केल्याचे दिसून आले आहे.