पुणे : पीएमपी व मेट्रोच्यातिकिटासाठी एकच ॲपचा वापर केला जाणार आहे. त्यामुळे फिडर सेवेच्या माध्यमातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची चांगली सोय होणार आहे. पीएमपी पुणे महापालिकेच्या क्षेत्रात दोन तर पिंपरी चिंचवडच्या क्षेत्रात चार मेट्रो स्थानकांवर फिडर सेवा देणार आहेत. सोमवारी याबाबत पीएमपी व पुणे मेट्रो प्रशासनाची बैठक होणार आहे. यात तिकिटाच्या दराबाबतचा निर्णयदेखील घेतला जाणार आहे. कॉमन मोबिलिटींतर्गत हा निर्णय घेण्यात आला.
पुणे मेट्रोची सेवा वनाज ते गरवारेदरम्यान सुरू झाल्यावर आता पीएमपी प्रशासनाने मेट्रोच्या मार्गावर फिडर सेवा देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार वनाज ते गरवारे या मार्गावर गरवारे व आनंद नगर या दोन मेट्रो स्टेशनला फिडर देण्याचे निश्चित झाले आहे. या दोन स्थानकांच्या परिसरात राहणाऱ्या प्रवाशांना मेट्रो स्थानकापर्यंत आणण्याचे काम पीएमपी करणार आहे. कोणत्या रस्त्यावरून अथवा बसथांब्यावरून प्रवासी घेऊन जायचे याचा अभ्यासदेखील पीएमपीच्या वाहतूक विभागाने केला आहे. मेट्रो प्रशासनाने अन्य स्थानकांची नावेदेखील पीएमपीला सुचविले. मात्र, त्या ठिकाणाहून मेट्रो स्टेशनला येणे पीएमपीसाठी अवघड वाटत असल्याने पीएमपीने गरवारे व आनंद नगर स्थानकांसाठी फिडर सेवा देण्याचे मान्य केले. सोमवारच्या बैठकीत याबाबतचे चित्र अधिक स्पष्ट होईल.
'गरवारे व आनंद नगर स्टेशनला पीएमपी प्रशासन फिडर सेवा देणार आहे. प्रवाशांना पीएमपी व मेट्रोची तिकिटे एकाच ॲपमधून मिळावे यासाठी प्रयत्न केले जात आहेत. तिकीट दराबाबतचा निर्णय लवकरच घेतला जाईल असे (दत्तात्रय झेंडे, वाहतूक व्यवस्थापक, पीएमपीएमएल, पुणे) यांनी सांगितले.'