पुणे : महात्मा फुले मंडई परिसरातील मेट्रो स्थानकाबाहेर पडल्यानंतर अतिक्रमण, अस्वच्छता, वाहतूक कोंडीची समस्या कायम आहे. हे चित्र बदलण्यासाठी मंडई परिसर अतिक्रमणमुक्त करण्यासह मंडईच्या ऐतिहासिक वास्तूच्या देखभाल दुरुस्तीसाठी विशेष लक्ष दिले जाणार आहे. त्यासाठी सव्वाकोटी रुपये खर्च करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
शिवाजीनगर न्यायालय ते स्वारगेट या भुयारी मार्गावरील मेट्रोला काही दिवसांपूर्वी सुरुवात झाली. स्वारगेट ते महात्मा फुले मंडई तसेच चिंचवड ते मंडई या स्थानकादरम्यान प्रवास करणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. मंडई मेट्रो स्थानकाच्या अंतर्गत भागातील कमालीची स्वच्छता सुखावणारी आहे. परंतु, मेट्रो स्थानकाच्या बाहेर पडताच नागरिकांना अतिक्रमणांमधून वाट काढत पुढे जावे लागते. महापालिका प्रशासनाकडून हे चित्र बदलण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. देखभाल दुरुस्तीसाठी सव्वाकोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मंडई परिसर शहराचे वैभव असून, आता तेथे मेट्रो स्थानक झाले आहे. तेथे अतिक्रमणे आहेत. ही अतिक्रमणे काढून त्यांची विभागनिहाय व्यवस्था केली जाईल. याबरोबरच मुख्य इमारतीमधील पावसाळी पन्हाळी बदलण्यात येतील. अन्य देखभाल दुरुस्तीची कामे केली जाणार आहेत, असे आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी सांगितले.