पुणे: स्वातंत्र्यदिनी दीड लाखांहून जास्त पुणेकरांनीमेट्रोने प्रवास केला. १ लाख ६९ हजार ५१२ प्रवाशांनी महामेट्रोला मंगळवारी एका दिवसात ३० लाख ६३ हजार रुपयांचे उत्पन्न मिळवून दिले. गुरूवारपासून दोन्ही मार्गांवरच्या मेट्रो पहाटेपासूनच धावणार आहेत. सकाळी ७ ते रात्री १० या वेळेत मेट्रो धावणार आहे.
मेट्रोचा विस्तारीत मार्ग सुरू झाल्यापासून प्रवासी संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सुरूवातीला जॉय राइड म्हणून मेट्रोकडे पाहिले जात होते. आता मात्र कामासाठी म्हणून मेट्रो वापरणाऱ्यांची संख्या वाढत आहे. मंगळवारी स्वातंत्र्यदिनी मेट्रोच्या सर्व स्थानकांवर गर्दी उसळली होती. मेट्रोने स्थानकांवर गोंधळ होऊ नये, यासाठी जादा प्रवाशांची व्यवस्था केली होती. स्वातंत्र्यदिनाची सुटी असल्याने अनेक पुणेकरांनी कुटुंबासहित मेट्रोने प्रवास केला. परतीचे तिकीट काढणाऱ्यांची संख्याही बरीच मोठी होती.
वनाज ते रुबी हॉल व पिंपरी ते सिव्हिल कोर्ट असे दोन मार्ग सध्या सुरू आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मागील वर्षी (६ मार्च २०२२) मेट्रोचे लोकार्पण झाले. त्यावेळी वनाज ते गरवारे महाविद्यालय व पिंपरी ते फुगेवाडी असे प्रत्येकी ५ किलोमीटरचे दोन लहान मार्गच सुरू झाले होते. त्यानंतर वर्षभर काहीच प्रगती झाली नाही. सुरूवातीच्या महिन्यात या दोन्ही मार्गांवर प्रवाशांची गर्दी होती. मात्र, नाविन्य म्हणून प्रवास करणाऱ्यांची संख्या लगेच रोडावली. त्यामुळेच मेट्रो तोट्यात अशी टीकाही होऊ लागली.
...हाेईल मेट्राे वापरकर्त्यांमध्ये वाढ
पंतप्रधान मोदी यांच्याच हस्ते १ ऑगस्टला विस्तारित मार्गाचे उद्घाटन करण्यात आले. वनाज ते रुबी हॉल व पिंपरी ते सिव्हिल कोर्ट या मार्गावर मेट्रो धावू लागली व लगेचच प्रवासी संख्या वाढली. स्वातंत्र्यदिनी तर प्रवासी संख्येने उच्चांकच केला आहे. आता वनाज ते रामवाडी व पिंपरी ते स्वारगेट अशा पूर्ण मार्गावर मेट्रो धावू लागल्यानंतर कामासाठी म्हणून मेट्रो वापरणाऱ्यांच्या संख्येत वाढ होईल, असे महामेट्रोच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
स्वातंत्र्यदिनी पावणेदाेन लाख जणांचा प्रवास
सोमवार, १४ ऑगस्ट रोजी ४१ हजार ५३६ लोकांनी मेट्रोने प्रवास केला. मंगळवारी मात्र स्वातंत्र्यदिनाच्या एकाच दिवसात १ लाख ६९ हजार ५१२ जणांनी प्रवास केला. पिंपरी-चिंचवड महापालिका ते दिवाणी न्यायालय मार्गावर ६१ हजार ८३४ प्रवाशांनी तर वनाज ते रुबी हॉल क्लिनिक या मार्गावर ६१ हजार ८८६ प्रवाशांनी प्रवास केला. यातील अनेकांनी परतीच्या प्रवासाचे तिकीट काढल्यामुळे प्रवास करणाऱ्यांची संख्या १ लाख ६९ हजार ५१२ इतकी मोजली गेली.