पुणे :पुणेमेट्रो मार्गावरील न्यायालयाजवळील स्थानकाचे नाव छत्रपती शिवाजी महाराज स्थानक व मंडईतील स्थानकाचे नाव महात्मा जोतिबा फुले स्थानक अशी करावीत, अशी मागणी मनसेच्या शिष्टमंडळाने महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
शहरातील सार्वजनिक वाहतुकीसाठी मेट्रो प्रकल्प उभारणीचे काम प्रगतिपथावर आहे. पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पात शहराच्या मध्यवर्ती भागात कामगार पुतळा, दिवाणी न्यायालयाजवळ स्थानकाची उभारणी करण्यात आली आहे. या स्थानकांची नावे शिवाजी नगर व मंडई अशी एकेरी ठेवली आहेत, त्या नावांना मनसेने विरोध केला आहे.
मनसेचे नेते बाबू वागसकर, शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांच्या नेतृत्वाखाली मनसेच्या शिष्टमंडळाने महापालिका आयुक्तांना निवेदन दिले आहे. यामध्ये शिवाजीनगर येथील स्थानकाचे नाव छत्रपती शिवाजी महाराज मेट्रो स्थानक व मंडई स्थानकाचे नाव महात्मा जोतिबा फुले मंडई स्थानक असे करावे, अशी मागणी करण्यात आली.