पुणे :मेट्रोच्या कामासाठी केलेली खाेदाई आणि त्यासाठी वापरण्यात आलेल्या अवजड मशिनरीमुळे संबंधित मेट्रो मार्गावरील रस्ते खराब होण्याचे प्रमाण अधिक आहे. यामुळे महापालिकेलाच नागरिकांच्या रोषाला सामाेरे जावे लागत आहे. त्यामुळे महापालिकेनेही नुकतीच महामेट्रो व टाटा कंपनीच्या अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेऊन हे रस्ते तत्काळ दुरुस्त करण्याच्या सूचना केल्या आहेत.
महापालिकेच्या पथ विभागाचे प्रमुख व्ही. जी. कुलकर्णी यांनी महामेट्रो व टाटा कंपनीने पाऊस उघडल्यावर म्हणजेच १५ ऑक्टोबरनंतर मेट्रो मार्गावरील रस्ते दुरुस्तीच्या कामास सुरुवात केली जाईल, अशी ग्वाही दिली असल्याचे सांगितले.
महापालिकेच्या हद्दीत सध्या वनाज ते रामवाडी व हिंजवडी ते शिवाजीनगर या दाेन मेट्राे मार्गाचे काम सुरू आहे. यातील वनाज ते रामवाडी या मेट्राे मार्गाचे काम महामेट्राे करीत आहे. तसेच हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो मार्गाचे काम पीएमआरडीएच्या माध्यमातून टाटा कंपनी करीत आहे. मुंबई बंगळुरू महामार्गापासून बालेवाडी ते खैरेवाडीपर्यंत मेट्रोचे पिलर उभारणीसाठी सध्या रस्त्याच्या मध्यभागातील ९ मीटर भाग बॅरिकेड्स लावून बंदिस्त केला आहे. मात्र, या ठिकाणी मेट्रोच्या कामासाठी येणाऱ्या अवजड यंत्रणेमुळे रस्त्याची दुरवस्था झाली असून, हीच परिस्थिती वनाज ते रामवाडीदरम्यान उद्भवली आहे.
पावसाळ्यात या रस्त्यांवरून प्रवास करताना दहा मिनिटांचे अंतर पार करण्यासाठी तास ते दीड तास लागत आहे. दरम्यान, या रस्त्यांचे दायित्व (देखभाल दुरुस्तीची जबाबदारी) महामेट्रो व टाटा कंपनीने घेतले असले तरी, रस्त्याच्या दुररुतीकडे त्यांनी फारसे लक्ष दिलेले नाही. यासंदर्भात महापालिकेने महामेट्राे व टाटा कंपनीला वेळाेवेळी पत्र पाठवून रस्त्यांची दुरुस्ती करण्यास सांगितले हाेते.
महामेट्राेने स्टेशन परिसरातील दाेन्ही बाजूचे प्रत्येकी दाेनशे मीटर व स्टेशन खालील एकशे चाळीस मीटर रस्ता, पदपथ दुरुस्त करण्याची जबाबदारी स्वीकारली हाेती. ती पार पडत नसल्याने महापालिका प्रशासनाने नुकतीच महामेट्राे, पीएमआरडीएच्या अधिकाऱ्याची बैठक घेतली. या बैठकीत खाेदाई केलेले रस्ते आणि कामामुळे खराब झालेले रस्ते पूर्ववत करून देण्यास सांगितले. या दोन्ही कंपन्यांनी १५ ऑक्टोबरनंतर रस्ते दुरुस्तीचे काम हाती घेतले जाईल, अशी ग्वाही दिली आहे.