पिंपरी : पिंपरी ते सिव्हिल कोर्ट आणि वनाज ते रुबी हॉल या दोन्ही मार्गावर नोव्हेंबर महिन्यात १४ लाख १८ हजार प्रवाशांनी मेट्रोतून प्रवास केला. पण, दिवसेंदिवस मेट्रो प्रवाशांची संख्या कमी होत आहे. ऑगस्टच्या तुलनेत नोव्हेंबरमध्ये सहा लाखांनी प्रवासी संख्या घटल्याचे दिसून येत आहे.
गरवारे महाविद्यालय ते रुबी हॉल आणि फुगेवाडी ते सिव्हील कोर्टपर्यंतचा मेट्रोचा विस्तारीत मार्ग ऑगस्ट महिन्यात सुरू झाला. भुयारी मेट्रो सुरू झाल्यामुळे नागरिकांमध्ये सुरुवातीचे काही दिवस उत्सुकता होती तसेच दररोज कामानिमित्त प्रवास करणारे प्रवासी मेट्रोचा वापर करु लागले. यामुळे ऑगस्ट महिन्यात २० लाख ४७ हजार प्रवाशांनी मेट्रोतून प्रवास केला होता. पण, त्यानंतर प्रत्येक महिन्यात मेट्रोची प्रवासी संख्या कमी होत गेली. नोव्हेंबर महिन्यात प्रवासी संख्या १४ लाखांच्या घरात आली आहे. त्यामुळे उत्पन्नामध्ये देखील घट झाली आहे. यापुढे मेट्रो प्रशासनापुढे प्रवासी वाढविण्याचे आव्हान असणार आहे.
काय आहेत कारणे
मेट्रोला कनेक्टेड असणारी पीएमपीची अपुरी फिडर सेवा
शेअर रिक्षाचे जादा दर
वाहने लावण्यासाठी पार्किंगच्या जागेचा अभाव
लोकलच्या तुलनेत मेट्रोचे तिकीट दर अधिक
मेट्रोचा विस्तार कमी
लोकल आणि मेट्रोचा मार्ग समांतर
महिना - मेट्रो प्रवाशांची संख्या - उत्पन्न
ऑगस्ट - २० लाख ४७ हजार - तीन कोटी सात लाख
सप्टेंबर - २० लाख २३ हजार - दोन कोटी ९८ लाख
ऑक्टोबर - १६ लाख ७२ हजार - दोन कोटी ४८ लाख
नोव्हेंबर - १४ लाख १८ हजार - दोन कोटी २० लाख
मार्ग - नोव्हेंबर महिन्याचे मेट्रोचे प्रवासी व उत्पन्न
वनाझ ते रुबी हॉल - आठ लाख ११ हजार १६६ - एक कोटी २२ लाख ४९ हजार
पिंपरी चिंचवड ते सिव्हील कोर्ट - पाच लाख ८२ हजार १३९ - नऊ कोटी ८२ लाख