पुणे : गरवारे स्थानक ते सिव्हिल कोर्ट व्हाया डेक्कन, संभाजी उद्यान, महापालिका या अंतरावर पुणेमेट्रोची शुक्रवारी चाचणी घेण्यात आली. २०७४ किलोमीटरचे हे अंतर मेट्रोने ४० मिनिटात पार केले. सिव्हिल कोर्ट स्थानकात जमलेल्या मेट्रोच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मेट्रो तिथे आल्यावर जोरदार स्वागत केले.
नियोजित वेळेनुसार, उद्दीष्टांनुसार व कसलाही अडथळा न येता ही चाचणी पार पडली असे महामेट्रोच्या वतीने सांगण्यात आले. आणखी दोन तीन दिवस अशीच चाचणी घेण्यात येईल. त्यानंतर दिल्लीतील मेट्रो सुरक्षा आयुक्त कार्यालयाकडून परिक्षण केले जाईल. त्यानंतर ते किती काळ किती वेग ठेवायचा हे निश्चित करून देतील व त्यानंतर वनाज ते सिव्हिल कोर्ट हा मार्ग व्यावसायिकपणे खुला होईल.
अशीच चाचणी आता पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट या मेट्रो मार्गाच्या फुगेवाडी ते सिव्हिल कोर्ट या भागाची घेण्यात येणार आहे. त्याचेही दिल्लीच्या यंत्रणेकडून परिक्षण होईल व त्यानंतर हाही मार्ग व्यावसायिक तत्वावर खुला होईल अशी माहिती महामेट्रोच्या अधिकाऱ्यांनी दिली. या मार्गावर शिवाजीनगर ते सिव्हिल कोर्ट हा भाग भूयारी आहे. त्याचेही सर्व काम पूर्ण झाले असून लवकरच या मार्गावरची चाचणी होईल.
चाचणी झालेल्या दोन्ही मार्गावर असलेल्या स्थानकांच्या कामाला महामेट्रोने गती दिली आहे. प्रत्यक्ष बांधकामाचे सर्व काम झाले आहे, आता काही किरकोळ कामे राहिली असून तीसुद्धा लवकरच पुर्ण करण्याबाबत ठेकेदार कंपनीला कळवण्यात आले आहे. मात्र स्थानकांचे काही काम अपुरे राहिले तरीही मेट्रो मार्ग मात्र सुरू करण्यात येणार आहे.
''महामेट्रोचे हे दोन्ही मार्ग पुर्ण झाल्यानंतर पुणे मेट्रोतील एक महत्वाचा टप्पा पार पडला आहे. शिवाजीनगर ते स्वारगेट या भूयारी मार्गातील शिवाजीनगर ते सिव्हिल कोर्ट या भूयारी मार्गातून मेट्रो धावणार आहे. - डॉ. ब्रिजेश दीक्षित- व्यवस्थापकीय संचालक, महामेट्रो.''