राजू इनामदार
पुणे: तंत्रज्ञान परदेशी असले तरी पुणेकरांच्यामेट्रोचे डबे भारतीय बनावटीचे स्वदेशी असणार आहेत. एकूण ३४ गाड्यांच्या १०२ डब्यांची निविदा कलकत्ता येथील टिटागडमधील भारतीय कंपनीला मिळाली आहे. इटलीतील परदेशी कंपनीच्या साह्याने ही कंपनी हे डबे तयार करणार आहे. ही परदेशी कंपनी मेट्रोचे अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त डबे तयार करणारी जगातील सर्वोत्कृष्ट कंपनी आहे.
उच्च गुणवत्तेच्या व विशेष प्रक्रिया करून तयार केलेल्या ॲल्यूमिनियम या धातूपासून हे डबे तयार केले जातील. एका डब्याची क्षमता ३२५ इतकी आहे. त्यात चालकामागच्या डब्यात ४४, मधल्या डब्यात ४० व नंतरच्या डब्यात पुन्हा ४४ अशी १३८ आसनांची व्यवस्था आहे. उर्वरित म्हणजे १८७ जण गाडीच्या मध्य भागात व कडेला उभे राहून प्रवास करतील. तीन डब्यांच्या गाडीतून एकावेळी ९७५ जण प्रवास करू शकतील. सुरुवातीला ३ डब्यांची व नंतर ६ डब्यांची गाडी असेल. त्यामुळेच स्थानकांचे फलाट ६ डबे थांबतील एवढ्या आकाराचेच करण्यात आले आहेत.
सर्व डबे वातानुकूलीत असणार आहेत. आकर्षक रंगात ते रंगवलेले असतील. त्यावर पुण्याची वैशिष्ट्य सांगणारी चित्रही असणार आहेत. त्यासाठी महामेट्रोने खास थीम ठरवून घेतल्या आहेत. त्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून ते आधुनिक काळातील वैशिष्ट्यांचाही समावेश आहे. गाडी पुण्याची वाटावी याची काळजी त्यात घेण्यात आली आहे.
सर्व डब्यांचे दरवाजे आपोआप खुले व बंद होतील. डब्यांच्या आतील बाजूस रंगीत डिजिटल डिस्प्ले असतील. त्यावर कोणते स्थानक आले, पुढील स्थानक किती अंतरावर आहे, गाडी सध्या कोणत्या ठिकाणी आहे वगैरे माहिती सतत प्रदर्शित होत राहील. त्याशिवाय जाहिराती तसेच गाडी सुरू असतानाची बाहेरची दृष्ये दाखवणारे काही डिस्प्लेही डब्याच्या आतील बाजूने लावण्यात येणार आहेत.
सुरक्षा महत्त्वाची-
प्रवाशांची सुरक्षा याला महामेट्रोने सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. त्यासाठी डब्यांमध्ये पॅनिक बटण आहे. संपूर्ण गाडीची दिशादर्शक यंत्रणा ही अत्याधुनिक यंत्रणायुक्त आहे. सर्व गाड्यांसाठी एक नियंत्रण केंद्र आहे. ते थेट चालकाबरोबर जोडलेले असणार आहे. प्रत्येक स्थानकात असेच एक उपकेंद्र असेल.
हेमंत सोनवणे, संचालक, जनसंपर्क, महामेट्रो