पुणे: शिवाजीनगर हिंजवडी या शहरातील दुसऱ्या मेट्रो मार्गाचे काम आता दिसू लागले आहे. २३.३ किलोमीटरचा हा मार्ग हिंजवडी आयटी पार्कमध्ये काम करणाऱ्यांसाठी रस्त्यावरची वाहतूक चूकवण्याचे वरदान ठरणार आहे. ४४० खांब आता तयार झाले असून बाणेर, बालेवाडी व अन्य काही ठिकाणी मिळून एकूण २ किलोमीटरचा मार्ग प्राथमिक स्वरूपात तयार झाला आहे.
पुण्यातील वनाज ते रामवाडी या मेट्रो मार्गासाठी सरकारने स्वतंत्र कंपनी स्थापन केली आहे. शिवाजीनगर हिंजवडी हा मेट्रो मार्ग मात्र पीपीपी तत्वावर (पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप) बांधला जात आहे. एका खासगी कंपनीकडे हे काम निविदेच्या माध्यमातून देण्यात आले आहे. त्याच कंपनीला काम पूर्ण झाल्यानंतर सलग ३५ वर्षे हा मार्ग चालवण्यासाठी दिला जाईल. तसा करार झाला आहे. पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) यांच्याकडे या कामाचे नियंत्रण आहे.
हिंजवडी परिसरातील आयटी कंपन्यांमध्ये ५ लाखांपेक्षा जास्त कर्मचारी आहे. त्यातील बहुसंख्य कर्मचारी पुण्यातून तिथे जातात. दुचाकी किंवा चार चाकी घेऊन दररोज या रस्त्याने प्रवास करत जाणे, त्यांच्यासाठी त्रासदायक आहे. त्यामुळे मेट्रोची कल्पना पुढे येऊन आता प्रत्यक्ष कामही सुरू झाली आहे. भूसंपादनाला बराच वेळ गेल्याने या कामाला निविदा मंजूर झाल्यानंतरही बराच विलंब झाला. मात्र आता सर्व भूसंपादन झाले आहे. त्यानंतर कंपनीकडून काम सुरू असून त्याला गती मिळाल्याने रस्त्यावरून आता हे काम दिसू लागले आहे.
एकूण ९०० खांबांपैकी ४०० खांब तयार झाले आहेत. दोन खांबांच्या मधल्या भागात काँक्रिटचे तयार भाग बसवले की मेट्रोचा मार्ग प्राथमिक स्वरूपात तयार होतो. आता असा प्राथमिक स्वरूपातील २ किलोमीटरचा मार्ग वेगवेगळ्या ठिकाणी तयार झाला आहे. त्यामुळे हे काम आता रस्त्यावरून दिसू लागले आहे. कंपनीने काँक्रिटचे भाग तयार करण्यासाठी स्वतंत्र कार्यशाळा (कास्टिंग यार्ड) सुरू केली आहे.
मार्च २०२५ ही या कामाची मुदत आहे. त्यानंतर सलग ३५ वर्षे हा मार्ग तो बांधणाऱ्या कंपनीकडेच राहणार आहे. त्यांच्याबरोबर केंद्र, राज्यस सरकार तसेच पीएमआरडीए यांचा करार झाला आहे. कंपनीची आर्थिक गुंतवणूक व्याजासह परत मिळेल अशा पद्धतीने तिकीट दर व उत्पन्नाच्या अन्य गोष्टींचा रचना करण्यात आली आहे.