पुणे : पुण्यात अद्याप मेट्रो प्रकल्प (pune metro) पूर्ण क्षमतेने सुरू झाला नाही, तरी येत्या १ एप्रिलपासून पुणेकरांना एक टक्का मेट्रो अधिभारचा भुर्दंड सहन करावा लागणार आहे. पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवडसाठी येत्या १ एप्रिलपासून मालमत्ता खरेदी-विक्री करताना एक टक्का मेट्रो कर द्यावा लागेल. त्यासंदर्भातील स्वतंत्र आदेश गुरुवारी नोंदणी मुद्रांक शुल्क विभागाने काढले.
पुण्यातील मेट्रो प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन ६ मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी (narendra modi) यांच्या हस्ते झाले. मेट्रो प्रकल्पाचे उद्घाटन झाले असले, तरी पहिल्या टप्प्यातील मेट्रो पूर्ण क्षमतेने सुरू होण्यासाठी बराच अवधी जाणार आहे.
पुण्यात मेट्रो प्रकल्पाची अंमलबजावणी होत असलेल्या राज्य शासनाने स्टॅम्प ड्युटीवर एक टक्का मेट्रो अधिभार लागू करण्याचा निर्णय चार वर्षांपूर्वी घेतला होता. यामध्ये मुंबई, पुणे, ठाणे आणि नागपूरमध्ये अंमलबजावणीस प्रारंभ झाला. परंतु २०२० मध्ये राज्य सरकारने या अधिभार वसुलीस ३१ मार्च २०२२ पर्यंत स्थगिती दिली होती. हा कालावधी संपुष्टात येत असल्याने पुण्यात एक एप्रिलपासून एक टक्का मेट्रो अधिभार लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. याशिवाय १ एप्रिलपासून नवीन व वाढीव रेडीरेकनर दरदेखील लागू होणार असल्याने घराच्या किमतीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.
प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू होईपर्यंत मेट्रो कराला स्थगिती द्या-
पुणे, पिंपरी-चिंचवड शहरातील पहिल्या टप्प्यातील मेट्रो प्रकल्पाचे उद्घाटन झाले असले, तरी हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू होण्यासाठी मोठा कालावधी लागणार आहे. यामुळेच शासनाने स्टॅम्प ड्युटीवर गतवर्षी सवलत दिली होती. त्यानुसार किमान आणखी एक वर्षे तरी मेट्रो अधिभार वसुलीस स्थगिती द्यावी, अशी आग्रही मागणी पुणेकर, बांधकाम व्यावसायिक व विविध संघटनांनी केली आहे.