पुणे : मेट्रोच्या वनाज ते रामवाडी व पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट या ३३ किलोमीटरच्या मार्गावरील वीजपुरवठा भुयारी मार्गासह १२ महिने २४ तास अखंड सुरू राहील. विजेअभावी मेट्रो क्षणभरही बंद होणार नाही. त्यासाठीची सर्व आवश्यक ती कामे महामेट्रो कंपनीने नुकतीच पूर्ण केली. याशिवाय सौर ऊर्जेद्वारेही वीजनिर्मिती केली जाणार असून, त्याचाही वापर करण्यात येणार असल्याची माहिती महामेट्रोच्या वतीने देण्यात आली.
राज्य विद्युत वितरण कंपनीने यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य केले. त्यांच्याकडून तीन ग्रीडमधून वीजपुरवठा केला जाईल. पिंपरी-चिंचवडसाठी चिंचवड ग्रीड, रेंजहिलसाठी गणेशखिंड ग्रीड, वनाजसाठी पर्वती ग्रीडमधून वीजपुरवठा केला जाईल. यामुळे एका ग्रीडमध्ये काही तांत्रिक बिघाड झाला तर लगेचच दुसऱ्या ग्रीडमधून वीजपुरवठा सुरू होणार आहे. रोहित्र, उच्च दाबाच्या वीज वाहक तारा, उपकेंद्र व अशा कामासाठी लागणारी सर्व यंत्रणा महामेट्रोने बसवली. मेट्रो व त्याशिवाय स्थानक, त्यावरील लिफ्ट, सरकते जिने, वातानुकूलित व्यवस्था, स्थानकातील विद्युत यंत्रणा या सर्व गोष्टींना आता विनाखंड वीजपुरवठा करणे शक्य होणार आहे, असे महामेट्रोच्या वतीने सांगण्यात आले. एकूण वीज वापरापैकी ११ मेगावॅट वीज सौर ऊर्जेतून मिळवली जाणार आहे. त्यासाठी प्रत्येक स्थानक, तसेच मेट्रोच्या प्रत्येक इमारतीच्या छतावर सोलार वीजनिर्मिती संच बसवले जाणार आहेत. वीजपुरवठा यंत्रणेचे सर्व नियंत्रण करणारी विशेष संगणकीय यंत्रणा मेट्रोच्या ऑपरेशन कमांड कंट्रोल सेंटरमध्ये बसवण्यात आली असून, त्याचे कामकाज सुरू झाल्याची माहिती देण्यात आली.
''या कामासाठी जागतिक दर्जाची पॉवर सप्लाय यंत्रणा बसवण्यात आली आहे. सर्व उपकरणे, ती बसवण्याचे काम अशा कामांसाठीचे आंतरराष्ट्रीय निकष पाळून तयार करण्यात आले आहे. प्रवाशांची सुरक्षा व सुविधा याला महामेट्रोने सुरुवातीपासून सर्वोच्च प्राधान्य दिले असून, हे कामही त्याचाच एक भाग आहे. - डॉ. बृजेश दीक्षित, व्यवस्थापकीय संचालक, महामेट्रो''