पुणे: पुणेमेट्रो प्रकल्पात अडथळा निर्माण करणाऱ्या शिवाजीनगर येथील कामगार पुतळा आणि राजीव गांधी नगर झोपडपट्टी धारकांच्या जागा ३१ मे पर्यंत मेट्रोच्या ताब्यात जाणार आहेत. या भागातील नागरिकांना विमाननगर आणि हडपसर याठिकाणी पुणे महानगरपालिकेकडून सदनिका उपलब्ध करून दिल्या आहेत. तरी सोमवारी पालिकेकडून संयुक्तपणे कार्यवाही करण्यात येणार असल्याचे झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण पुणे पिंपरी चिंचवड क्षेत्र यांनी अशी माहिती दिली आहे.
महापालिकेच्या आदेशानुसार,सोमवारपासून सदनिकांच्या वितरणाचे काम सुरू होत आहे. पहिल्या टप्प्यात विमाननगर येथील घरे देण्याचे काम सुरू होईल. त्यानंतर हडपसरच्या सदनिकांचे वाटप करण्यात येईल. त्यानुसार झोपडपट्टी धारकांना कळवण्यात येणार आहे.
सध्या कोरोनामुळे पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरामध्ये संचारबंदी आहे. त्यामुळे कुठेही गर्दी न होण्याचे भान ठेवून सदनिका वितरणाचे काम केले जाणार आहे.
शिवाजीनगर कोर्टाजवळ विशेष नोंदणीकरण विभागाची पथके नेमण्यात येणार आहेत. सोमवार पासून नोंदणी झाल्यावरच सदनिका वाटप करण्यात येईल.
सदनिकांचे स्थलांतर २४ ते ३१ मे या कालावधीत सकाळी १० ते ६ यावेळेत होणार आहे. झोपडपट्टी धारकांना घरातील सामान हलवण्यासाठी ४ हजार रुपये वाहतूक भत्ता देण्यात येणार आहे. झोपडपट्टी धारकांनी आठ दिवसात स्थलांतरित होणे गरजेचे आहे.