पुणे : मेट्रोचेप्रवासी आता स्वत:ची सायकल घेऊनही मेट्रोने प्रवास करू शकता. शशांक वाघ असे सायकल घेऊन प्रवास करणारे सोमवारी पहिलेच प्रवासी ठरले. गरवारे महाविद्यालय ते आनंदनगर असा प्रवास त्यांनी केला.
सोमवारी सकाळीच वाघ आपली सायकल घेऊन गरवारे स्थानकात आले. बरोबर ८ वाजता मेट्रो सुरू झाली. सायकल घेऊन स्थानकात चाललेल्या वाघ यांना सुरक्षा रक्षकाने मनाई केली, मात्र वाघ यांनी त्याला वरिष्ठांबरोबर बोलण्यास सांगितले. महामेट्रोने सुरूवातीपासूनच आपली स्वत:ची सायकल घेऊन मेट्रोने प्रवास करण्यास परवानगी दिली आहे. सुरक्षा रक्षकाला तसे सांगितल्यानंतर वाघ यांना स्थानकात प्रवेश मिळाला. त्यांनी तिकीट काढले. सायकल घेऊन स्थानकाच्या दुसऱ्या मजल्यावर आले व गाडीत सायकलसह प्रवेश केला. आनंदनगरला गाडीतून खाली उतरले व सायकल घेऊन स्थानकाबाहेर आले.
वाघ यांनी सांगितले की, रस्त्यावरील वाहतूकीचा ताण कमी करण्यासाठी सायकल व मेट्रो हा उत्तम सहयोग आहे. परदेशांमध्ये सायकलींसाठी स्वतंत्र बोगी असते. आपल्याकडे अशी स्वतंत्र बोगी करणे शक्य नाही, तरीही महामेट्रोने परवानगी दिली आहे ही चांगली गोष्ट आहे.
प्रवाशांनी विशेषत: महाविद्यालयीन युवकांनी याचा वापर करावा... ''सायकलसह प्रवासाला परवानगी देण्यात आली आहे, मात्र अन्य प्रवाशांना सायकलचा त्रास होणार नाही याची सायकलधारी प्रवाशांनी काळजी घ्यावी. सध्या तरी सायकलसाठी स्वतंत्र जागा नाही, मात्र डब्याच्या मागे वगैरे सायकल लावता येणे शक्य आहे असे हेमंत सोनवणे (संचालक, जनसपंर्क, महामेट्रो) यांनी सांगितले आहे.''