लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पुणे महानगर नियोजन समितीवर निवडणुकीच्या माध्यमातून ३० सदस्य निवडणुकीची प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले होते. त्यासाठीची प्रक्रिया सुरू केली आहे. मतदार याद्या तयार करण्यास, तसेच लोकसंख्यानिहाय सदस्यांची संख्या निश्चित करण्याचे काम सुरू आहे, यासाठी जिल्ह्यातील ७३१ ग्रामपंचायतींकडून माहिती मागविली आहे.
विभागीय आयुक्त सौरभ राव यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. लोकसंख्येच्या प्रमाणानुसार ही सदस्य संख्या निवडता येणार आहे. ही निवड मतदानाच्या माध्यमातून करणार आहे. त्यासाठी मतदार यादी तयार करण्याचे काम सुरू आहे. मतदार यादी तयार करण्यासाठी पुणे प्रदेश महानगर विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) हद्दीतील ७३१ ग्रामपंचायतींचे सरपंच, पंचायत समित्यांचे सभापती, पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सर्व नगरसेवक आणि नगरपालिकांतील नगरसेवकांची माहिती या स्थानिक स्वराज्य संस्थांकडून मागविण्यात आली आहे.
महाराष्ट्र महानगर नियोजन समिती रचना व अधिनियम या कायद्यानुसार ४५ सदस्यांची ही नियोजन समिती स्थापन करणे आवश्यक आहे. त्यामध्ये दोन तृतीयांश सदस्य हे निवडणुकीद्वारे निवडून नियुक्त करण्याचे बंधन आहे. निवडून येणाऱ्या सदस्यांमध्ये या समितीच्या कार्यक्षेत्रातील महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगर परिषदा आणि ग्रामपंचायत या स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधी; तर उर्वरित १५ सदस्यांची निवड राज्य सरकारमार्फत करण्याची तरतूद त्यामध्ये आहे. त्यामध्ये आमदार, खासदारांचाही समावेश असावा अशी तरतूद करण्यात आली आहे.