पुणे - पुणे महानगर परिवहन महामंडळातर्फे (पीएमपी) शहरातील ८ प्रमुख मार्गांवर प्रत्येक मिनिटाला एक, तर अन्य तीन मार्गांवर दर दोन मिनिटाला एक बस धावेल असे नियोजन करण्यात आले आहे. या शिवाय गर्दीच्या वेळी बसची संख्या वाढविणे, काही मार्गांच्या फेºयांत वाढ करणे आणि काही बसचे मार्ग वाढविण्यात आले आहेत. या बदलाची अंमलबजावणी देखील सुरु झाली असल्याची माहिती पीएमपीचे व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. कात्रज-स्वारगेट, स्वारगेट-शिवाजीनगर, मनपा भवन-निगडी, औंध-डांगे चौक, येरवडा-खराडी बायपास रस्ता, महात्मागांधी स्थानक-हडपसर रस्ता, डेक्कन-वारजेमाळवाडी आणि डेक्कन ते कोथरुड या मार्गावर दर मिनिटाला एक बस धावेल असे नियोजन करण्यात आले आहे. सिमला आॅफिस ते हिंजवडी रस्ता, कासारवाडी ते भोसरी रस्ता आणि संगमवाडी येथे विश्रांतवाडी रस्त्यावर दर दोन मिनिटाला बस धावेल. या अकरा मार्गावर एकूण १ हजार ५८२ बस १७ हजार ९६८ फेºया दर दिवशी करतील. या शिवाय शनिपार, अप्पर, स्वारगेट, कोथरुड, भारती विद्यापीठ अशा विविध १६ मार्गांवरील बसची संख्या १ पासून ५ पर्यंत वाढविण्यात आली आहे. या मार्गावरील बसची संख्या ८० वरुन ११४ पर्यंत वाढविण्यात आली आहे. गर्दीच्या १९ मार्गावरील बसच्या संख्येत २१८ वरुन ३२१ पर्यंत वाढ करण्यात आली असून, येथील खेपा १ हजार ९९ होतील.
महिलांसाठी ७ मार्गावर विशेष बस
महिलांसाठी भोसरी-मनपा भवन (३१५ बस क्रमांक), निगडी-मनपा भवन (१२३), कात्रज-शिवाजीनगर (२), भेकराईनगर-मनपा (१११), कात्रज-महाराष्ट्र हौसिंग बोर्ड (२४), वारजे माळवाडी-मनपा (८२) आणि धनकवडी-न.ता.वाडी (३८) अशा ८ बस धावतील. यातील कात्रज ते शिवाजीनगर या मार्गावर २ बसच्या २४ फेºया होतील.