पुणे: कोरोना टाळेबंदी ऊठल्यावर परराज्यातील आपापल्या घरी गेलेले मेट्रोचे २ हजार कामगार कामावर परत हजर झाले आहेत. त्यामुळे आता रखडलेल्या कामाला गती मिळाली असून ऑगस्ट अखेरीस मेट्रोच्या भूयारी मार्गाच्या बोगद्याचे काम सिव्हिल कोर्टजवळ पोहचेल.
कोर्टाजवळ पुणे मेट्रोचे भुयारी स्थानक आहे. त्या जागेतून भूयार खोदण्याचे काम आधीच सुरु आहे. तिथे रस्त्यावरून आत आडव्या बाजूने बोगदा खोदला जात आहे. शिवाजीनगरहून टनेल बोअरिंग मशिनने जमिनीखाली ३० मीटर खोल जाऊन बोगदा होत आहे. ते काम एससी बोर्ड इमारतीपर्य़त पोहचले आहे. ते सिव्हिल कोर्ट जवळ आले की भुयारी स्थानक बांधणीचे काम सुरू होईल.
कामगारांअभावी मेट्रोची सगळी कामे रखडली होती. ३ हजार कामगार काम करत होते. मात्र कोरोना टाळेबंदीनंतर पहिल्यांदाच प्रवासाची परवानगी मिळाली व २ हजारपेक्षा जास्त कामगार आपापल्या राज्यात निघून गेले. ते आता परत येऊ लागल्याने मेट्रोच्या कामाला गती मिळाली आहे.
महामेट्रोचे संचालक अतूल गाडगीळ म्हणाले, "आता भूयारी मार्गाबरोबरच रस्त्यावरच्या मेट्रो स्थानकांचेही काम सुरू होत आहे. त्यामुळे आणखी मजुरांची गरज लागेल. आधीचे ३ व आणखी २ असे एकूण ५ हजार कामगार लागतील. देशभरात अनेक ठिकाणी मेट्रोची कामे सुरू आहेत. त्यामुळे एखादे काम संपले की ठेकेदार कंपनीकडून तेथील मजूर बोलावले जातात. त्यामुळे मजूरांची कमतरता भासणार नाही." आणखी बरेच मजूर ऊत्तर प्रदेश, बिहार, झारखंड या राज्यात अडकले असून त्यांच्या जिल्ह्यातील प्रशासकीय अधिकार्यांंना या मजूरांच्या पाठवणीची व्यवस्था करण्याविषयी पत्र पाठवण्यात आली आहेत असे गाडगीळ म्हणाले.
पुण्यातील वनाज ते गरवारे महाविद्यालय या मार्गाला व पिंपरी- चिंचवड मध्ये फुगेवाडी स्थानकांच्या कामांंना प्राधान्य देण्यात आले आहे. त्यामुळे वनाज, आयडियल कॉलनी, गरवारे महाविद्यालय व तिकडे पिंपरी- चिंचवड, फुगेवाडी या स्थानकांचे काम वेगाने करण्याचा प्रयत्न आहे अशी माहिती महामेट्रोचे सरव्यवस्थापक हेमंत सोनवणे यांनी दिली. कोरोना टाळेबंदीने किमान तीन महिन्यांचा व मजूर गावी गेल्याने एक महिन्याचा अशा ४ महिन्यांचा वेळ विनाकाम गेला. त्यामुळे कामाचे वेळापत्रक बिघडले असले तरी हा वेळ भरून काढण्याविषयी ठेकेदार कंपनीला कळवण्यात आले असल्याचे सोनवणे यांनी सांगितले.