बिबवेवाडी : देशातील सर्वांत वेगाने तयार झालेला प्रकल्प म्हणजे पुणेमेट्रो असून स्वारगेट येथे मल्टी मॉडेल हब तयार करण्याची संकल्पना माधुरी मिसाळ यांनी मांडली, त्यांची ही कल्पना सार्वजनिक वाहतूक व्यवस्था जोडणारा देशातील सर्वांत मोठा आणि अत्याधुनिक हब ठरणार असल्याचा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
पर्वती विधानसभा मतदारसंघातील आमदार माधुरी मिसाळ यांच्या प्रचारार्थ राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जाहीर सभेचे बिबवेवाडी येथील यशवंतराव चव्हाण शाळेसमाेरील रस्त्यावर आयाेजन करण्यात आले हाेते, या उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बाेलत हाेते. यावेळी व्यासपीठावर केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर माेहाेळ, माजी मंत्री आमदार पंकजा मुंडे, शहराध्यक्ष धीरज घाटे, आमदार माधुरी मिसाळ, माजी मंत्री विजय शिवतारे, आणि पदाधिकारी उपस्थित हाेते.
यावेळी आमदार माधुरी मिसाळ यांच्या कार्य अहवाल प्रकाशन देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले ‘लाडकी बहीण योजना अमलात आणली त्यावेळेस आमच्यावर मोठ्या प्रमाणात टीका करून योजना फसवी असल्याचे सांगण्यात आले. मात्र ,अडीच कोटी महिलांच्या खात्यात आम्ही आतापर्यंत पैसे भरले आहेत. महाविकास आघाडीचे नेते लाडकी बहीण योजनेच्या विरोधात असून त्यांनी न्यायालयात देखील दाद मागून योजना म्हणजे पैशांचा चुरडा असल्याचे सांगितले. परंतु आम्ही ही योजना बंद होऊ दिली नाही आणि भविष्यात देखील योजना बंद करणार नाही. आमदार माधुरी मिसाळ यांनी आपल्या प्रास्तविक भाषणात पर्वतीमधील विकासकामांचा पाढा वाचला तर केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पुण्यातील विकासकामांची माहिती दिली.
बंड झाले थंड तरी भिमाले यांची अनुपस्थिती लढणार आणि जिंकणार असा नारा देऊन पर्वतीमध्ये बंड केलेल्या माजी सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांचं बंड जरी थंड झाले असले तरी त्यांची या सभेतील अनुपस्थितीत लक्ष वेधून घेत होती, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरून भिमाले यांनी माघार घेतली असल्याचे केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले असले तरीही मिसाळ आणि भिमाले यांच्यामधील दरी अजून ही कमी झाली नसल्याचे या अनुपस्थितीतून दिसून येत आहे.