Pune Mhada Lottery 2021: दिवाळीच्या मुहूर्तावर 3 हजार पेक्षा अधिक घरांची लाॅटरी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2021 09:39 PM2021-10-18T21:39:23+5:302021-10-18T21:39:47+5:30
दिवाळीच्या मुहूर्तावर पुणे गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास मंडळाच्या (म्हाडा) वतीने तब्बल तीन हजाराहून अधिक घरांसाठी लाॅटरी काढण्यात येणार आहे
पुणे : दिवाळीच्या मुहूर्तावर पुणे गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास मंडळाच्या (Mhada) वतीने तब्बल तीन हजाराहून अधिक घरांसाठी लाॅटरी काढण्यात येणार आहे. एका वर्षांत घरांच्या लाॅटरीची " हॅटट्रिक " करत म्हाडा'च्या पुणे विभागाचे मुख्य अधिकारी नितीन माने पाटील यांनी आणखी एक विक्रम केला आहे. यापूर्वी दोन-तीन वर्षांतून एखादी लाॅटरी काढली जात होती.
कोरोनामुळे सर्वसामान्य नागरिकांची आर्थिक परिस्थिती खूपच बिघडली आहे. अशा स्थितीत गरीब व आर्थिक दुर्बल घटकातील लोकांचे घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पुणे म्हाडाने पुढाकार घेतला आहे. ऐन कोरोना काळात जानेवारी २०२० मध्ये म्हाडाच्या वतीने इतिहासातील सर्वात मोठी म्हणजे तब्बल ५ हजार ६५७ घरांची सोडत काढून मोठा दिलासा दिला होता. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते काढण्यात आलेल्या लाॅटरीला प्रचंड चांगला प्रतिसाद मिळाला.
त्यानंतर म्हाडाच्या इतिहासात प्रथमच गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर पुणे, पिंपरी-चिंचवडसह विभागातील सांगली, सोलापूर, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यात तब्बल अडीच हजार घरांची सोडत म्हाडाने काढली होती. त्यानंतर आता दिवाळीचा मुहूर्त साधत पुणे म्हाडा आणखी तीन हजार पेक्षा अधिक घरांसाठी लाॅटरी काढत आहे. यामध्ये दीड हजार घरे वीस टक्क्यातील व सर्व नामांकित व मोठ्या बिल्डरांच्या प्रकल्पातील असल्याची माहिती माने पाटील यांनी दिली.
लोकांना परवडणारी घरे देणे हाच उद्देश
''शासनाने केलेल्या कायद्याची कडक अंमलबजावणी करत सर्व मोठ्या बिल्डरांकडून २० टक्क्यांतील घरे सर्वसामान्य नागरिकांना परवडणा-या दरामध्ये उपलब्ध करून देणे हा उद्देश ठेऊन गेल्या एक -दीड वर्षांत आठ हजार घरांची सोडत काढण्यात आली. यामुळे हजारो लोकांना चांगल्या प्रकल्पांमध्ये हक्कांची घरे मिळाली आहेत अशी माहिती पुणे विभाग म्हाडाचे मुख्य अधिकारी नितीन माने-पाटील दिली.''