पुणे: पौड रस्त्यावरील घोटवडे फाट्याजवळील उरवडे रोड येथे एका सॅनिटायझर बनविणाऱ्या कंपनीला सोमवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. (Pune MIDC Fire) या आगीत लागून १८ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. यामध्ये प्रामुख्याने महिला कामगारांचा समावेश आहे. आणखी काही कामगार अडकले असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. अग्निशमनदलाचे जवान घटनास्थळी पोहोचले असून अडकलेल्या कामगारांना वाचवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
भीषण आग लागलेल्या या कंपनीत आणखी काही कामगार अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. अडकलेल्या कामगारांना वाचवण्यासाठी कंपनीच्या भिंती तोडण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यासाठी जेसीबीचा वापर करण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळाल्यावर पुणे महापालिका आणि पीएमआरडीएच्या अग्निशमक दलाच्या गाड्या तातडीने रवाना झाल्या. मात्र, सॅनीटायझर बनविले जात असल्याने आगीने थोड्याच वेळात रौद्र रुप धारण केले होते. स्थानिक ग्रामस्थांनीही तातडीने धाव घेतली. घटनास्थळी आक्रोश आणि किंकाळ्या ऐकू येत होत्या. जेसीबीच्या सहाय्याने भिंत फोडून कामगारांना सुखरूप बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू केले आहे.
संबंधित घटना ही उरवडे येथील औद्योगिक वसाहतीत असलेल्या एसव्हीएस अक्वा टेक्नॉलॉजिस या कंपनीत घडली. कंपनीत रोजच्यासारखं काम सुरु होतं. नेहमीप्रमाणे कामगार आपलं काम करत होते. मात्र अचानक दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास एक मोठा स्फोट झाला आणि भीषण आग लागली. आग मोठ्या प्रमाणात वाढत गेल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. संबंधित कंपनी ही क्लोरिफाईडची असल्याने आग जास्त भडकली. आगीमागील नेमकं खरं कारण काय? याचा तपास सध्या पोलिसांकडून सुरु आहे. दरम्यान, प्रशासकीय अधिकाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होऊन कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.
मुळशीत शोककळा
या घटनेमुळे संपूर्ण मुळशीत शोककळा पसरली आहे. मृतक सर्व महिला या गरीब घरातल्या होत्या. त्यांच्यावर कुटुंबाची जबाबदारी होती. त्यामुळे परिसरात खूप हळहळ व्यक्त केली जात आहे. मृतकांची ओळख पटणं देखील कठीण आहे.