पौड रस्त्यावरील घोटवडे फाट्याजवळील उरवडे रोड येथे एका सॅनिटायझर बनविणाऱ्या कंपनीला भीषण आग लागून काही कर्मचाऱ्यांना यात होरपळून मृत्यू झाला. यामध्ये प्रामुख्याने महिला कामगारांचा समावेश आहे. सोमवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास ही आग लागली होती. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेबद्दल दु:ख व्यक्त करत मृतांच्या कुटुंबीयांना आणि जखमींना मदत करण्याची घोषणा केली आहे.
पंतप्रधान कार्यालयानं ट्विटरद्वारे यासंदर्भातील माहिती दिली. "महाराष्ट्रात पुण्यातील एका कारखान्यात लागलेल्या आगीत मृत्यूमुखी पडलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या जवळच्या नातेवाईकास 'पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून' २ लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा पंतप्रधानांनी केली आहे. जखमी व्यक्तींना ५० हजार रुपयांची मदत करण्यात येणार आहे," असं पंतप्रधान कार्यालयानं सांगितलं आहे.